Sagar Gupta Success Story : कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक तरुण नोकरीच्या शोधात असतो, पण काही तरुण असे असतात, जे नोकरी करत नाहीत, तर नोकरीसाठी कंपनीच स्थापन करतात. देशात असे अनेक तरुण उद्योजक आहेत, ज्यांनी अल्पावधीतच आपल्या व्यवसायाने आणि कमाईने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या यादीत नोएडाच्या सागर गुप्ता यांचेही नाव जोडले गेले आहे. या तरुण उद्योजकाने आपल्या वडिलांबरोबर मिळून केवळ ४ वर्षात ६०० कोटींचे व्यवसायाचे साम्राज्य उभे केले. ज्या वयात सागर गुप्ताने हा पराक्रम गाजवला, ते फार थोडक्याच लोकांना जमते. २२ व्या वर्षी दिल्ली विद्यापीठाच्या अत्यंत प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्षभरात सागरने आपल्या वडिलांबरोबर व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला सीए व्हायचे होते, पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्याच्या कारकिर्दीत मोठे वळण आले.
उत्पादन व्यवसायाने उंची गाठली
शिक्षणानंतर सागर गुप्ता यांना उत्पादन व्यवसायात उतरायचे होते. ३ दशकांच्या सेमीकंडक्टर व्यापारानंतर त्यांच्या वडिलांनी एलईडी टेलिव्हिजन उत्पादन युनिट सुरू केले, तेव्हा सागर यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. २०१९ मध्ये त्यांनी नोएडामध्ये त्यांची कंपनी सुरू केली. हे काम इतकं सोपं नसलं तरी वडिलांच्या मदतीने त्यांनी संपर्क साधला आणि सॅमसंग, तोशिबा आणि सोनी या ब्रँड्सची निर्मिती सुरू केली. एलईडी उत्पादन उद्योगात चीनचे वर्चस्व होते, परंतु हे क्षेत्र भारतातही वेगाने उदयास येत आहे.
हेही वाचाः BSE-NSE ने दिली आनंदाची बातमी; अदाणींच्या ‘या’ ३ कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना आता होणार फायदा
१०० हून अधिक परदेशी कंपन्यांना पुरवठा
सागर गुप्ताची कंपनी आता १०० हून अधिक कंपन्यांसाठी एलसीडी टीव्ही, एलईडी टीव्ही आणि हाय-एंड टीव्ही तयार करते. कंपनी दर महिन्याला १ लाखाहून अधिक टीव्ही बनवते. २०२२-२३ मध्ये त्यांच्या कंपनीचा महसूल ६०० कोटी रुपये होता. सागर गुप्ता यांना आता वॉशिंग मशिन, स्पीकर आणि स्मार्ट घड्याळे यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या निर्मितीमध्येही पाऊल टाकायचे आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, सागर गुप्ता यांना नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आहे. जमीन, उपकरणे आणि सुविधा खरेदी करण्यासाठी कंपनी प्रथम ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सध्या त्यांचा सोनीपतमध्ये कारखाना आहे आणि त्यात १००० हून अधिक कर्मचारी आहेत. कंपनी येत्या ३ वर्षात IPO देखील आणू शकते.