अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची ईव्ही कार कंपनी टेस्लाच्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात आता जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी टेस्लाच्या भारत प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “टेस्लाला भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत प्रवेश करणं सोपं असणार नाही, कारण टेस्लाला भारतात टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या देशांतर्गत कंपन्यांच्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.”

टाटा, महिंद्रा जे करू शकतात ते…

अर्न्स्ट अँड यंग ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्कारांमध्ये बोलताना जिंदाल यांनी पुढे असा दावा केला की, “टेस्ला आणि त्यांचे सीईओ एलॉन मस्क यांना भारतीय बाजारपेठ आव्हानात्मक वाटू शकते. एलोन मस्क येथे नाहीत. ते अमेरिकेत आहेत. ते भारतात यशस्वी होऊ शकत नाहीत! इथे आपण भारतीय आहोत. ते महिंद्रा जे करू शकते, टाटा जे करू शकतो ते निर्माण करू शकत नाहीत.”

भारतात यशस्वी होणे सोपं काम नाही

एलॉन मस्क यांच्या उद्योग क्षेत्रातील कामगिरीबाबत बोलताना जिंदाल म्हणाले, “ते खूप हुशार आहेत, यात काही शंका नाही. ते एक असामान्य व्यक्ती आहेत, अंतराळासह इतर क्षेत्रातही त्यांचे काम आहे. त्यांनी अद्भुत काम केले आहे, म्हणून मला त्यांच्याकडून काहीही हिरावून घ्यायचे नाही. पण भारतात यशस्वी होणे सोपं काम नाही.”

दरम्यान, जेएसड्ब्लयू ग्रुपने एमजी मध्ये ३५% हिस्सा खरेदी करून ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश केला असून, भारतात एक मजबूत ईव्ही इकोसिस्टम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

टेस्लाचं पहिलं शोरूम मुंबईतील बीकेसीमध्ये

५ वर्षांच्या भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी केल्यानंतर टेस्लाने भारतातील त्यांचे पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीचे दुसरे शोरूम दिल्लीतील एरोसिटी येथे सुरू होणार आहे. टेस्लाने त्यांच्या अधिकृत लिंक्डइन पेजवर भारतातील नोकऱ्यांच्या संधीबाबतही देखील पोस्ट केल्या आहेत.

टेस्ला सुरुवातीला त्यांच्या बर्लिन प्लांटमधून थेट भारतीय बाजारपेठेत त्यांच्या ईव्ही कार आणेल. सध्या, भारत सरकार ११०% आयात शुल्क १५% पर्यंत कमी करण्याच्या नवीन प्रस्तावावर काम करत आहे.

Story img Loader