पीटीआय, नवी दिल्ली
अदानी समूहातील बंदर विकास क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने (एपीएसईझेड) म्यानमारमधील बंदराची तीन कोटी डॉलरला विक्री केल्याचे बुधवारी जाहीर केले.
सरलेल्या वर्षात म्हणजेच मे २०२२ मध्ये, एपीएसईझेडने त्याच्या म्यानमार बंदराच्या विक्रीसाठी समभाग खरेदी करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली होती. मान्यमारमधील परिस्थितीमुळे बंदरासंबंधित मंजुरी प्रक्रियेतील सततचा विलंब आणि काही अटी-शर्ती पूर्ण करण्यात येणारी आव्हाने पाहता बंदर विक्री करण्याचा निर्णय घेतला. विक्री करारानुसार, विक्रेत्याने सर्व आवश्यक अनुपालन पूर्ण केल्यावर खरेदीदार तीन कामकाज दिवसांच्या आत विक्रेत्याला संपूर्ण रक्कम देईल. एकूण व्यवहारमूल्य प्राप्त झाल्यावर, एपीएसईझेड खरेदीदाराकडे समभाग हस्तांतरित करेल, असे एपीएसईझेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक करण अदानी म्हणाले.
प्रकल्पाला अडचणीची किनार
करण अदानी यांनी जुलै २०१९ मध्ये म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन आंग हलाईंग यांची भेट घेतली. त्यांनी निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात बंडाचे नेतृत्व केले होते. मिन आंग हलाईंग यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर हा प्रकल्प वादात सापडला होता.