लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : जपानस्थित सॉफ्टबँकेने भांडवली बाजार नियामक सेबीच्या अधिग्रहणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्समधील २ टक्क्यांहून अधिक समभागांची विक्री केली आहे.
बाजार मंचाने दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँकेची कंपनी असणाऱ्या एसव्हीएफ इंडिया होल्डिंग्ज (केमन) लिमिटेडने १० फेब्रुवारी २०२३ आणि ८ मे २०२३ दरम्यान वन९७ कम्युनिकेशन्समधील १,३१,०३,१४८ शेअर्स विकले आहेत, जे एकूण समभागसंख्येच्या अंदाजे २.०७ टक्के होते. हा व्यवहार सुमारे ९८५ कोटी रुपयांना पार पडला. यांनतर सॉफ्टबँकेची पेटीएममध्ये सुमारे ११.१७ हिस्सेदारी म्हणजेच सुमारे ७,०८,०९,०८२ समभाग आहेत. सॉफ्टबँकेने याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये वन९७ कम्युनिकेशन्समधील ४.५ टक्के हिस्सेदारी सुमारे १,६२७ कोटी रुपयांना विकली होती. सॉफ्टबँकेने २०१७ मधील अखेरच्या तिमाहीत पेटीएममध्ये १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.
हेही वाचा – दिवाळखोरीची चर्चा स्पाईसजेटने फेटाळली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबीच्या अधिग्रहणासंबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी वन९७ कम्युनिकेशन्समधील अँट समूहदेखील समभाग विक्री करण्याची शक्यता आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारच्या सत्रात पेटीएमचा समभाग २.७४ टक्क्यांच्या म्हणजेच १९.८० रुपयांच्या घसरणीसह ७०७.८० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअर बाजारातील समभागांच्या किमतीनुसार कंपनीचे ४४,८७० कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.