दक्षिण कोरियातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांतील आघाडीची कंपनी सॅमसंगने नोएडा येथील प्रकल्पातून चालू वर्षापासून लॅपटॉप उत्पादन सुरू करण्याबरोबर गॅलेक्सी एस २४ मोबाईलचे उत्पादनही घेणार असल्याचे सोमवारी अधिकृतरित्या जाहीर केले. याबाबत सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष टी. एम. रोह म्हणाले की, भारतात लॅपटॉपचे उत्पादन करण्यासाठी तयारी सुरू आहे. आम्ही नोएडातील प्रकल्पातून यावर्षी लॅपटॉप उत्पादन सुरू कऱणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भारतीय रेल्वेने ‘या’ ९ महिन्यांत आतापर्यंतचा सर्वाधिक भांडवली खर्चाचा केला वापर

भारत हे सॅमसंगसाठी महत्त्वाचे उत्पादन केंद्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून विविध पातळ्यांवर कंपनीला पाठबळ मिळाले आहे. भारतातील उत्पादन क्षेत्र भक्कम करण्यासाठी कंपनी सरकारला सहकार्य करीत राहील. सॅमसंगने नुकताच गॅलेक्सी एस२४ हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. त्यात कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे उत्पादन नोएडातील प्रकल्पातून करण्याची घोषणाही रोह यांनी केली. ते म्हणाले की, नोएडातील प्रकल्प हा सॅमसंगचा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प आहे. जागतिक मागणीनुसार कंपनी प्रकल्पाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पातून सध्या फीचर फोन, स्मार्टफोन, टॅबलेटसह इतर उपकरणांचे उत्पादन कंपनीकडून सुरू आहे. आता या वर्षापासून लॅपटॉपचे उत्पादनही सुरू होईल.