वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अंबुजा सिमेंटने मंगळवारी सांघी इंडस्ट्रीजला विलीन करून घेण्याची योजना जाहीर केली. गेल्या वर्षी अंबुजा सिमेंटने या कंपनीचे ५,१८५ कोटी रुपयांना अधिग्रहण करीत, ५४.५१ टक्के हिस्सेदारी मिळविली आहे.
अंबुजा सिमेंटने तिच्या उपकंपन्या असलेल्या सांघी इंडस्ट्रीज आणि पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज यांना विलीन करून घेऊन, अदानी समूहाचा सिमेंट व्यवसाय अधिक स्पर्धात्मक आणि कार्यक्षम बनवण्याचा उद्देश आहे. यातून भागधारकांचे मूल्य वाढविले जाणे अपेक्षित आहे, असे अदानी समूहातील सिमेंट व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर म्हणाले.
हेही वाचा >>>घाऊक महागाईतही घसरण; नोव्हेंबरमध्ये तीन महिन्यांतील नीचांकावर
अंबुजा सिमेंटचे किती समभाग मिळणार?
सांघी इंडस्ट्रीजचे अंबुजा सिमेंटमध्ये विलीनीकरणानंतर, तिच्या भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक १०० समभागांसाठी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या अंबुजा सिमेंटचे १२ समभाग प्रदान केले जातील. यामुळे सांघीचे पात्र भागधारक हे अंबुजा सिमेंटचे भागधारक बनतील. येत्या ९ ते १२ महिन्यांच्या कालावधीत हे विलीनीकरण पूर्णत्वाला जाण्याची अपेक्षा आहे.
मुंबई शेअर बाजारात मंगळवारच्या सत्रात अंबुजा सिमेंटचा समभाग ५७१.१० रुपयांवर बंद झाला, तर सांघी इंडस्ट्रीजचा समभाग किरकोळ घसरणीसह ७६.९० रुपयांवर स्थिरावला. समभागाच्या सध्याच्या बाजारभावानुसार सांघी इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल १,९८६ कोटी रुपये आहे.