लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः देशातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेने तिच्या १०६ वर्षांच्या इतिहासातील आणि नागरी सहकारी बँकांच्या इतिहासातील देखील सर्वाधिक ५०२.९९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा सरलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षात नोंदवला आहे.सारस्वत बँकेची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (२७ जुलै) दादरमध्ये पार पडली, त्याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी बँकेने एकूण व्यवसायात ८२,००० कोटींचा टप्पा पार केल्याचेही स्पष्ट केले. या प्रसंगी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष समीर कुमार बॅनर्जी, कार्यकारी संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी आरती पाटील आणि बँकेचे अन्य संचालक उपस्थित होते.
बँकेचा ढोबळ नफा २०२३-२४ मध्ये ७८६.४३ कोटी रुपये आहे. भविष्यातील जोखीम नियंत्रणाकरिता बँकेने १२५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त फ्लोटिंग निधीची तरतूद केली आहे. ही तरतूद बँकेने केली नसती, तर निव्वळ करोत्तर नफा ६२८ कोटी रुपये झाला असता, असे ठाकूर म्हणाले. गतवर्षी बँकेने ३५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
बँकेचा एकूण व्यवसाय ३१ मार्च २०२४ अखेर, ८२,०२४.७७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यात ठेवींचा वाटा ४९,४५७.३१ कोटी रुपयांचा, तर बँकेकडून वितरीत कर्जे ३२,५६७.४६ कोटी रुपये इतकी आहेत. बँकेने २.८८ टक्के अशी इतिहासातील सर्वात कमी ढोबळ अनुत्पादित कर्जे (ग्रॉस एनपीए) नोंदविली असून, निव्वळ अनुत्पादित कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण सलग दोन वर्षांपासून शून्य टक्क्यांवर कायम राखले आहे. महाराष्ट्रासह, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यात बँकेच्या ३०२ शाखा असून, सुमारे ४,५०० कर्मचारीवृंद कार्यरत आहे.