पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच भूमिपूजन केलेल्या महाराष्ट्रातील पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर जागतिक आकर्षणाचा बिंदू ठरत असून, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर १२ लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण करेल, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी येथे प्रतिपादन केले.
मुंबईत येत्या १८ आणि १९ नोव्हेंबरला पार पडणाऱ्या ‘सागरमंथन: द ग्रेट ओशन डायलॉग’ या परिषदेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. गेल्या आठवड्यात ३० ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराचे भूमिपूजन केले. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे आधुनिक मेगा कंटेनर पोर्ट, अंदाजे १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह संपूर्णपणे नव्याने विकसित केले जात आहे. सोनोवाल म्हणाले, सागरी व्यापार परिसंस्था कार्बनमुक्त करण्याच्या हरित संक्रमणाच्या प्रयत्नांचे भारताकडून नेतृत्व केले जात आहे. विशेषत: ‘ग्रीन टग ट्रांझिशन कार्यक्रमा’द्वारे, केवळ देशाचाच फायदा होणार नाही तर इतर देशांसाठी त्यांच्या हवामान संक्रमणामध्ये एक प्रारूप म्हणूनही ते काम करेल.
हेही वाचा >>>Relief For Pensioners : ‘ईपीएस-९५’धारकांना निवृत्तिवेतन कोणत्याही बँकेतून काढता येणे शक्य
वर्ष २०२३ मध्ये पार पडलेल्या ‘ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट’च्या यशावर त्यांनी जोर दिला, जेथे भारताने ११९ अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त केले आहेत. सोनोवाल यांनी जागतिक पातळीवरील नेत्यांसह, उद्योजक, तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांसह त्यासंबंधित सर्व भागधारकांना मुंबईतील सागरमंथन परिषदेच्या पहिल्यावहिल्या पर्वासाठी आमंत्रित केले आहे.