पीटीआय, दुबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत वाढीला चालना देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, सौदी अरेबियाने तेल उत्पादनात प्रतिदिन १० लाख पिंपांच्या कपातीचा एकतर्फी घेतलेला निर्णय, आणखी एका महिन्याने वाढवून सप्टेंबर अखेरपर्यंत राबवणे सुरू ठेवत असल्याचे गुरुवारी जाहीर केले.

जुलैपासून सुरू झालेली ही १० लाख पिंप प्रतिदिन सौदी कपात त्यामुळे आता सप्टेंबरमध्येही सुरू राहिल. हा ताजा निर्णय तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना ‘ओपेक प्लस’ने जूनमध्ये झालेल्या बैठकीत आधी जाहीर केलेली तेल पुरवठ्यातील कपात पुढील वर्षभरापर्यंत म्हणजेच २०२४ सालापर्यंत वाढवण्यास सहमती दर्शवल्यानंतर आला आहे. याच्या परिणामी गेल्या काही दिवसांपासून खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती भडकल्या असून, त्या निरंतर पिंपामागे ८३ डॉलर व त्या पातळीच्या वर राहिल्या आहेत आणि त्यात पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता विश्लेषक वर्तवत आहेत.

त्या परिणामी देशांतर्गत पुन्हा पेट्रोल-डिझेल तसेच स्वयंपाकाच्या गॅस किमतीत दरवाढीचे चक्र सुरू होईल, जे एकंदर महागाईच्या भडक्याला इंधन देणारे ठरेल.सरकार-संचालित ‘सौदी प्रेस एजन्सी’च्या प्रसिद्धी निवेदनात या कपात विस्ताराची घोषणा केली गेली. तेथील ऊर्जा मंत्रालयातील अधिकाऱ्याने तर गरज भासल्यास ही कपात आणखी विस्तारण्याचे तसेच लांबवली जाण्याची शक्यता असल्याचेही बोलून दाखविले. रशियानेही सप्टेंबरमध्ये तेलाच्या निर्यातीत प्रति दिन तीन लाख पिंपांनी कपात अलिकडेच जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saudi arabia unilaterally decided to cut oil production by 1 million barrels per day print eco news amy