नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी आराम्को देशातील दोन सरकारी तेल कंपन्यांशी भागीदारासह दोन नियोजित तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असून त्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे, असे या संबंधाने थेट माहितीगार सूत्रांनी गुरुवारी सूचित केले. सरकारी मालकीच्या बीपीसीएल आणि ओएनजीसी यांच्याशी याबाबत तिची बोलणी सुरू आहे.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. पाश्चात्य कंपन्यांनी स्वच्छ इंधनांकडे वळण्यासाठी खनिज तेलाची प्रक्रिया क्षमता कमी केल्याने भारत जागतिक तेल शुद्धीकरण केंद्र बनू इच्छित आहे. दरम्यान, रशियाने जगासाठी सवलतीच्या किमती तेल उपलब्ध करून दिल्यामुळे भारताच्या तेल आयातीतील सौदी अरेबियाचा वाटा लक्षणीय कमी झाला आहे.
आंध्र प्रदेशातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) नियोजित तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि पश्चिम गुजरातमधील प्रस्तावित ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओएनजीसी) प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आराम्कोची स्वतंत्रपणे बोलणी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. आराम्को, तसेच केंद्र सरकारच्या मालकीच्या बीपीसीएल आणि ओएनजीसी यांनी यावर अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला. आंध्र प्रदेश रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पात ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याचे अंदाजण्यात आले आहे. आराम्कोकडून गुंतवणूक झाली नाही तरी या कंपन्यांच्या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू राहणार आहे.
आराम्कोकडून संभाव्य गुंतवणुकीचा आकार स्पष्ट करण्यात आलेला नाही. तथापि प्रत्येक प्रकल्पातील त्याच्या हिस्सेदारीच्या तिप्पट समतुल्य खनिज तेल पुरवण्याचा प्रस्ताव तिने ठेवला असल्याचे बोलले जात आहे. प्रकल्पातून तयार होणाऱ्या उत्पादनातील तिचा वाटा भारतात किंवा निर्यातीद्वारे ती विकू इच्छित आहे. मात्र जर आपण त्यांना ३० टक्के हिस्सा दिला तर ते प्रकल्पाच्या क्षमतेच्या ९० टक्के इतके खनिज तेल पुरवू इच्छितात जे शक्य नाही, असे तेल शुद्धीकरण क्षेत्रातील अन्य एक सूत्राने स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या तिमाहीत सौदी अरेबियाला भेट देण्याची योजना आखत आहेत आणि या भेटीपूर्वी हा करार मार्गी लावण्याचा उभयतांचा प्रयत्न असेल, असे या सूत्रांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील यावर अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
आराम्कोचे भारतात प्रवेशाचे आजवरचे प्रयत्न
आराम्को भारतात रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी बराच काळापासून प्रयत्नशील आहे. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजशी करार देखील केला होता. मात्र जमीन खरेदी करण्याच्या अडचणींमुळे हा प्रचंड तेल शुद्धीकरण प्रकल्प लांबणीवर पडला आणि मूल्यांकनातील फरकांमुळे रिलायन्ससोबतचा करार रद्द करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रात रत्नागिरीत तीन सरकार तेल कंपन्यांशी भागीदारीतील १२ लाख पिंप प्रति दिन क्षमतेचा प्रस्तावित प्रकल्पही त्यावर तापलेल्या राजकारणाने मागे पडला. याबाबत विचारले असता, प्रत्येकी ४,००,००० पिंप प्रतिदिन क्षमतेच्या तीन तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे केंद्रीय तेलमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जानेवारीमध्ये मुंबईतच विधान केले होते.