मुंबई : खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी विस्तार योजनांवर गुंतवणूक वाढवली असून, त्या परिणामी २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत उद्योग क्षेत्राला साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले जाण्याची अपेक्षा आहे, असे आश्वासक प्रतिपादन देशातील सर्वात मोठ्या बँकेचे अध्यक्ष दिनेश खरा यांनी एका वृत्तसंस्थेशी झालेली बातचीतीत केले.
हेही वाचा >>> पेटीएमच्या संस्थापकांची कंपनीतील हिस्सेदारीत वाढ; चीनच्या ‘ॲन्ट फायनान्शियल’च्या १०.३ टक्के भागभांडवलाची खरेदी
भारतीय अर्थव्यवस्थेत गेली अनेक वर्षे खासगी गुंतवणुकीची वानवा स्पष्टपणे दिसून येेत आहे. तथापि, सरकारने भांडवली खर्चात केलेली वाढ आणि त्या परिणामी एकंदर मागणी वाढल्याने कंपन्यांकडून उत्पादन क्षमता वाढविली जाण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत. हे चित्र आशादायी असून, वाढीव कर्जाच्या मागणीपैकी जवळपास ८० टक्के मागणी ही खासगी क्षेत्राकडून येत आहे, असे खरा यांनी सप्ताहअखेरीस रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे बड्या उद्योगांकडून मागणीतील वाढीचा, लघू आणि मध्यम उद्योगांवरदेखील नेहमीच परिणाम होत असतो. वर्षाच्या उर्वरित कालावधीत ३.५ लाख कोटी रुपयांच्या वितरित कर्जापैकी सुमारे ७० टक्के कर्ज हे मुदत कर्ज या स्वरूपात असेल आणि त्यातून आर्थिक वर्षात बँकेच्या उद्योग क्षेत्राला होणाऱ्या कर्ज वितरणांत १२ ते १३ टक्क्यांच्या वाढीस मदत होईल, असे खरा म्हणाले. स्टेट बँकेचे ३० जून २०२३ पर्यंत देशांतर्गत एकूण कर्ज वितरण २८ लाख कोटी रुपये इतके होते.
हेही वाचा >>> टेक्नोग्रीन सोल्यूशन्सचा विस्तार योजनेसाठी ‘आयपीओ’चा प्रस्ताव
भारतातील सध्या कर्जाची मागणी ही मुख्यतः गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जासाठी आहे आणि गेल्या वर्षभरात चढ्या व्याज दरांमुळे या कर्ज विभागावर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य ताणाबद्दल स्टेट बँक खूप सजग आहे. बँकेच्या किरकोळ कर्जापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त कर्जे ही पगारदार खातेधारकांची आहेत, ज्यामुळे कर्जदाराच्या रोख प्रवाहासंबंधीचे चित्र बँकेसाठी अधिक सुस्पष्ट रूपात मिळते आणि त्या परिणामी या विभागात कर्ज थकण्याचे प्रमाणही अल्पतम राखले जाते.
मागणीचे चित्र कसे?
अक्षय्य ऊर्जा, बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज तसेच विद्युत शक्तीवरील वाहने (ईव्ही) यासारख्या नवीनतम क्षेत्रात नवीन प्रकल्प येऊ घातले आहेत, असे ते म्हणाले. तर पारंपरिक प्रमुख क्षेत्रांमध्ये, पोलाद, सिमेंट, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विमानतळ यांसारख्या क्षेत्रातील क्षमता वाढीच्या योजनांची भर पडताना दिसत आहे, असे स्टेट बँक अध्यक्षांनी स्पष्ट केले.
व्यवसायावर सुपरिणाम
भारतीय बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ मागील काही महिन्यांत दुहेरी अंकातील आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षातील मे महिन्यापासून व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ करूनही कर्जांची मागणी कायम राहिल्याचा बँकांच्या व्यवसायावर सुपरिणाम दिसत आहे. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात २४.७ टक्के वाढ होऊन ते ३८,९०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्याजापोटी नफ्याची मार्जिन (निम) २४ आधारबिंदूंनी वाढून ३.४७ टक्क्यांवर गेली आहे. परिणामी बँकेने सलग चौथ्या तिमाहीत विक्रमी कामगिरी करीत, जूनअखेर तिमाहीत निव्वळ नफा तिपटीने वाढवून १६,८८४ कोटी रुपयांवर नेला आहे.