वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) विक्रमी १० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा अनोखा टप्पा गाठणारे हे देशातील पहिलेच म्युच्युअल फंड घराणे आहे.
एसबीआय म्युच्युअल फंडाचे एयूएम २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७.१७ लाख कोटींवरून २७ टक्क्यांनी वाढून ९.१४ लाख कोटींवर पोहोचले. तर गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये (आर्थिक वर्ष २०२१ ते २०२४ पर्यंत), त्यात सुमारे २७ टक्क्यांहून अधिक वार्षिक चक्रवाढ दराने भर पडली. अलीकडेच एसबीआय एनर्जी अपॉर्च्युनिटीज फंडाने १.७ लाख नवीन गुंतवणूकदारांसह ६,८०० कोटी रुपये गोळा केले, तर एसबीआय ऑटोमोटिव्ह अपॉर्च्युनिटीज फंडाने १.११ लाखांहून अधिक नवीन गुंतवणूकदारांसह ५,७१० कोटी रुपये मिळविले. सध्या, एसबीआय म्युच्युअल फंड घराणे ११६ योजनांचे व्यवस्थापन करते. यापैकी ४४ इक्विटी अर्थात समभागसंलग्न योजना, ६ संकरित (हायब्रिड) योजना, ५७ कर्जरोख्यांशीसंबंधित (डेट) योजना, दोन कमॉडिटी-आधारित योजना आणि सात इतर योजना (इंडेक्स फंड आणि ईटीएफ) आहेत.
हेही वाचा – उच्च परतावा क्षमता राखणारा :‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’
म्युच्युअल फंड उद्योगाचे एयूएम किती?
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता मे २०२४ अखेर ५८,५९,९५१ कोटींवर पोहोचली आहे. जी ३१ मे २०१४ ते ३१ मे २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत १०.११ लाख कोटींवरून ५८.५९ लाख कोटींवर पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत मालमत्ता दुपटीने वाढली आहे.
हेही वाचा – मार्ग सुबत्तेचा : वैयक्तिक अर्थसंकल्प – काळाची गरज
एसबीआय एमएफची कोटक महिंद्र बँकेतील हिस्सेदारी ५ टक्क्यांपुढे
एसबीआय म्युच्युअल फंडाने खासगी बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेतील ५ टक्क्यांहून भागभांडवल खरेदी केले आहे. कोटक महिंद्र बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय एमएफने आतापर्यंत ५.०१ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. फंड घराण्याने ५ जून रोजी खुल्या बाजारातून २१.५७ लाख समभाग खरेदी केले आहेत.