मुंबईः देशातील सर्वात मोठे फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने दोन नवीन योजना गुंतवणुकीसाठी खुल्या केल्या आहेत. दोन्ही योजना निष्क्रिय व्यवस्थापन (पॅसिव्ह) धाटणीच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) बँकांवर आधारीत आहेत.
यापैकी एसबीआय बीएसई पीएसयू बँक इंडेक्स फंड ही योजना ‘बीएसई पीएसयू बँक इंडेक्स’ या निर्देशांकाचा माग घेणारी एक मुदत-मुक्त समभागसंलग्न योजना आहे. तर दुसरा एसबीआय बीएसई पीएसयू बँक ईटीएफ हा त्याच निर्देशांकावर बेतलेला एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. दोन्ही योजनांसाठी नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) कालावधी सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी खुला झाला आणि गुरुवार, २० मार्च २०२५ रोजी तो बंद होईल. या कालावधीत किमान गुंतवणुकीची रक्कम ५,००० रुपये अशी आहे.
गुंतवणूकदारांना भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्राच्या वाढीमध्ये भाग घेण्याची संधी दिली जावी, असे या योजनांचे उद्दिष्ट आहे. दोन्ही योजनांचे निधी व्यवस्थापक हे विरल छडवा हे आहेत. दोन्ही नवीन फंड प्रामुख्याने बीएसई पीएसयू बँक निर्देशांकाद्वारे व्यापलेल्या सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतील. एकूण मालमत्तेच्या किमान ९५% ते १००% या शेअर्समध्ये गुंतविले जातील. याव्यतिरिक्त, ते तरलता व्यवस्थापित करण्यासाठी सरकारी सिक्युरिटीज, त्रिपक्षीय रेपो आणि लिक्विड म्युच्युअल फंडाच्या युनिटमध्ये ५% पर्यंत वाटप करू शकतात.