SBI भारतीय स्टेट बँकेने अर्थात एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्याने एसबीआयनेही त्यांच्या गृहकर्जधारकांना गृहकर्जावरचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे आधीच्या तुलनेत होम लोन अर्थात गृह कर्जाचे व्याज दर कमी झाले आहेत. त्यामुळे गृहकर्जधारकांना आधीच्या तुलनेत EMI भरण्याचा पर्याय निवडता येईल.

RBI रेपो रेटमध्ये केली कपात

या आठवड्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने सलग दुसऱ्या धोरण आढावा बैठकीत रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६ टक्के केला होता. यामुळे गेल्या दोन महिन्यांत एकूण ५० बेसिस पॉइंट्सची कपात झाली आहे. या कपातीमुळे गृह कर्जांवरील व्याजदर कमी होणार आहेत. मात्र, बँकांनी आता मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केल्याने मुदत ठेवीदारांवरही याचा परिणाम होणार आहे.

SBI ने किती कमी केले व्याजदर?

SBI ने त्यांच्या रेपो लिंक्ड लँडिंग रेट मध्ये सुधारणा केल्या आहेत. जो आता आता ८.५० टक्क्यांवरुन एसबीआयने ८.२५ टक्के करण्यात आला आहे. एसबीआयने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि व्यक्तीगत (पर्सनल लोन) कर्ज यांवरच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे. यामुळे या तिन्ही कर्जांवरचे EMI कमी होणार आहेत. याआधी एचडीएफसी बँक आणि महाराष्ट्र बँकेनेही व्याजदर कमी केले आहेत.

एसबीआयच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ एप्रिलपासून ३ कोटी रुपयांपेक्षा कमी आणि एक ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर १० बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत.

एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आता ६.७ टक्के व्याजदर मिळेल, जो पूर्वी ६.७ टक्के होता. दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी, सुधारित दर ६.९ टक्के असेल, जो पूर्वी ७ टक्के होता.

ज्येष्ठ नागरिकांसाठी, एसबीआय आता एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७.२ टक्के (७.३ टक्के आधीचा दर) आणि दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ७.४ टक्के (७.५ टक्के आधीचा दर) व्याजदर देत आहे.

एसबीआयची अमृत कलश ठेव योजना मागे

एसबीआयने काही दिवसांपूर्वीच त्यांची अमृत कलश विशेष मुदत ठेव योजना मागे घेतली आहे, ज्यामध्ये ४०० दिवसांच्या कालावधीसाठी ७.१ टक्के व्याज देण्यात येत होते. ही योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ३१ मार्च २०२५ रोजी बंद करण्यात आली.