पीटीआय, नवी दिल्ली : यूटय़ूब वाहिनीवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून दोन कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत फेरफार करून आर्थिक लाभ मिळविल्याच्या प्रकरणी अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि इतरांसह एकूण ४५ जणांवर गुरुवारी कारवाई करताना, बाजार नियामक ‘सेबी’ने त्यांना एक वर्षांसाठी भांडवली बाजारातील व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे.
गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओमधून, दूरचित्रवाणी वाहिनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि नवी दिल्लीस्थित प्रसारण क्षेत्रातील कंपनी शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची शिफारस करण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटय़ूब व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. समभागांच्या किमती फुगवून स्वत:पाशी असलेल्या समभागांची विक्री करून मोठा आर्थिक लाभ मिळविण्यात आला.
वारसी दाम्पत्याव्यतिरिक्त, साधना ब्रॉडकास्टच्या काही प्रवर्तकांनाही बाजारात व्यवहारांवर बंदी आणली गेली आहे. बाजार-व्यवहारांवर बंदीव्यतिरिक्त, नियामकांनी दोन वेगळय़ा अंतरिम आदेशांनुसार या प्रकरणी आरोपींनी बेकायदेशीररीत्या कमावलेला ५४ कोटी रुपयांचा नफ्यावर जप्तीही आणली आहे. साधना ब्रॉडकास्टच्या समभागांच्या किमती फुगवून, अर्शद वारसीला २९.४३ लाख रुपयांचा नफा झाला आहे आणि त्याच्या पत्नीला ३७.५६ लाख रुपयांचा नफा झाला आहे, तसेच त्याचा भाऊ इक्बाल हुसैन वारसीला ९.३४ लाखांची कमाई झाली आहे, असे सेबीने नमूद केले आहे. भांडवली बाजार नियामकांनी या तिघांना अवाजवी उलाढाल वाढविणारे अर्थात ‘व्हॉल्यूम क्रिएटर्स’ म्हणून आदेशपत्रात वर्गीकृत केले आहे.
प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन, नियामकांनी एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीतील संबंधित दोन कंपन्यांच्या समभागांसंबंधी रीतसर तपासणी केली आणि त्यात एप्रिल ते जुलै २०२२ च्या मध्यापर्यंत दोन कंपन्यांच्या समभागांची किंमत आणि उलाढालही लक्षणीय वाढली असल्याचे दिसून आले. जुलै २०२२ च्या उत्तरार्धात, साधनाविषयी खोटे आणि दिशाभूल करणारे ‘द अॅडव्हायजर’ आणि ‘मनीवाइज’ हे दोन व्हिडीओ यूटय़ूब वाहिनीवर प्रसारित करण्यात आले होते. शार्पलाइनबद्दलही गेल्या वर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात ‘मिडकॅप कॉल्स’ आणि ‘नफा यात्रा’ शीर्षक असलेले दोन व्हिडीओही प्रसारित करण्यात आले होते.
कारवाई काय?
त्यानुसार, नियामकांनी दोषी ४५ जणांना, पुढील आदेश दिला जाईपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोखे/ समभागांची खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले गेले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सर्वाना ‘सेबी’च्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये शिल्लक असलेल्या पैशासह जंगम किंवा स्थावर कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू नये असे निर्देश दिले गेले आहेत.