‘एसएमई आयपीओ’ क्षेत्रात किमतीत फेरफारीकडे निर्देश
मुंबई : भांडवली बाजारातील सध्याचे तेजीचे उधाण हे अतर्क्य भासावे अशा पातळीला गेले असून, काही स्मॉल व मिड कॅप समभागांच्या वधारलेले भाव हे बुडबुडा असल्याचे दर्शवणारे तसेच लघू व मध्यम उद्योगांची समभाग विक्री अर्थात ‘एसएमई आयपीओ’ क्षेत्रात किमतीमध्ये फेरफाराची चिन्हे दिसत असल्याचे सुस्पष्ट संकेत सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बूच यांनी सोमवारी दिली.
एसएमई प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) आणि सूचिबद्धता या दोन्ही टप्प्यांवर किमती इप्सित हेतून फुगवल्या जात असल्याचे दिसत असून, गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
येथे आयोजित कार्यक्रमात केवळ महिला पत्रकारांशी संवाद साधताना बूच म्हणाल्या की, आम्हाला भांडवली बाजारात किमतीत फेरफार केल्याची चिन्हे दिसत आहेत. आमच्याकडे ही चिन्हे तपासणारे तंत्रज्ञान आहे. आम्हाला फेरफाराच्या काही ठराविक पद्धती दिसून येत आहेत. हे प्रकार आता सुरू झाले असून, त्याचा परिणाम अद्याप स्पष्ट झालेला नाही. भांडवली बाजार नियंत्रक म्हणून आम्ही सल्लागारांसोबत विदा विश्लेषण करून सर्व पैलू तपासत आहोत. काही गैरप्रकार आढळल्यास, माहिती उजेडात आणली जाईल आणि त्यावर लोकांची अभिप्राय मागवले जातील. मात्र नियामकांकडून या संबंधाने नेमकी कोणती आणि केव्हा पावले टाकली जातील, याचा त्यांनी खुलासा केला नाही.
हेही वाचा >>> स्मॉल, मिड कॅप फंडांवर निर्गुंतवणुकीचा ताण नसल्याचा उद्योग क्षेत्राचा निर्वाळा
स्मॉल आणि मिड-कॅप समभागांबद्दल विचारले असता, ‘गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मूल्यांकनात तीव्र स्वरूपाची वाढ झाली आहे,’ असे बूच यांनी कबूल केले. बाजारात हा घटक ताणलेल्या बुडबुड्यासारखा वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.
नियम बदलासाठी प्रयत्न… लघु व मध्य उद्योग क्षेत्र हे मुख्य बाजारमंचावर दाखल होणाऱ्या बड्या कंपन्यांपेक्षा वेगळे आहे. या कंपन्यांकडून गुंतवणूकदारांसाठी जाहीर करावयाच्या प्रकटीकरणाच्या अटी-शर्ती बदलायला हव्यात, यासाठी ‘सेबी’ प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या. एसएमई कंपन्यांचे नियमन वेगळे, प्रकटीकरणाचे नियम वेगळे, तसेच त्यांच्या संबंधाने जोखीमही वेगळी असते याची गुंतवणूकदारांनी दखल घ्यायला हवी, असेही बुच यांनी नमूद केले.