नवी दिल्ली : आगामी वर्षातील १ फेब्रुवारीपासून पात्र शेअर दलालांना (क्वालिफाइड स्टॉक ब्रोकर – क्यूएसबी) त्यांच्या ग्राहकांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ संलग्न किंवा ‘थ्री-इन-वन’ ट्रेडिंग खाते यापैकी एक सुविधा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना अधिक सशक्त करणारे हे पाऊल आहे.

क्यूएसबी अर्थात क्वालिफाइड स्टॉक ब्रोकरने सध्याच्या व्यवहार सुविधेव्यतिरिक्त या दोन पर्यायांपैकी एक सुविधा १ फेब्रुवारीपासून उपलब्ध करणे आवश्यक ठरेल. थ्री-इन-वन ट्रेडिंग खाते म्हणजेच ज्यामध्ये, बचत खाते, डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते अशा तिन्हींचा समावेश असायला हवा. या प्रकरणात, ग्राहकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात असतील आणि खात्यातील रोख शिलकीवर त्यांना व्याज मिळत राहील. जेणेकरून, व्यवहारासाठी दलालांकडे आगाऊ रक्कम जमा करून ठेवण्याची गरज उरणार नाही.

हेही वाचा >>> विमान इंधन दरात ६ टक्के कपात; वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग

सोमवारी झालेल्या सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, सध्याच्या ट्रेडिंग पद्धती व्यतिरिक्त, दुय्यम बाजारात (कॅश मार्केट) व्यवहार करताना ‘एएसबीए’सारखी सुविधा ‘यूपीआय’समर्थ व्यवहारातही प्रदान केली जावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. ग्राहकांना यातून त्यांच्या बँक खात्यातच रोखून ठेवलेल्या (ब्लॉक) निधीच्या आधारे दुय्यम बाजारात समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची मुभा मिळेल.

सेबीने जानेवारी २०१९ पासून प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) सहभागी होण्यासाठी ‘एएसबीए’अंतर्गत बँक खात्यातच निधी ‘ब्लॉक’ करण्याच्या सुविधेला सुरुवात केली आणि आता यूपीआयच्या माध्यमातून आयपीओ अर्ज करण्याची परवानगीही गुंतवणूकदारांना दिली गेली आहे.