मुंबई :  स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडात गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढल्याने भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ताणलेल्या बुडबुड्याचा संकेत देत सावधगिरीचा इशारा दिला असला, तरी त्यावर आधारित म्युच्युअल फंडांतून गुंतवणुकीचा ओघ बाहेर जाण्याची शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विमान कंपन्यांना लवकरच अच्छे दिन! प्रवासी संख्या करोनापूर्व १५ कोटींपुढे जाण्यासह, तोटाही घटण्याची शक्यता

‘सेबी’ अध्यक्षा माधवी पुरी बूच यांनी सोमवारी मुंबईत जाहीर कार्यक्रमात या संबंधाने इशारा दिला. मात्र त्यापूर्वीच गेल्या महिन्यात म्युच्युअल फंड घराण्यांना याबाबत तिने सूचना केल्या होत्या. स्मॉल आणि मिड कॅप फंड क्षेत्रात बुडबुडा निर्माण होत असताना दिसत आहे. त्यामुळे या घराण्यांनी स्मॉल आणि मिड कॅप फंडातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी चौकट आखावी, असे ‘सेबी’ने म्हटले होते. मागील काही तिमाहींमध्ये स्मॉल आणि मिड कॅप फंडात गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना होती. मात्र, आगामी काळात या फंडातील गुंतवणूक घटणार नाही आणि ओघही कायम राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मिड कॅप म्युच्युअल फंडात २०२३ मध्ये सुमारे २३ हजार कोटी रुपयांची आणि स्मॉल कॅप फंडात ४१ हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आली. त्याआधीच्या वर्षात २०२२ मध्ये मिड कॅप फंडात २० हजार ५०० कोटी रुपये आणि स्मॉल कॅप फंडात १९ हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. त्या तुलनेत लार्ज कॅप फंडात २०२२ मध्ये ७,२८१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. तर लार्ज कॅप फंडातून २०२३ मध्ये सुमारे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली.

हेही वाचा >>> रुल्का इलेक्ट्रिकल्सचा व्यवसाय विस्तारासाठी २५ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट

स्मॉल आणि मिड कॅप फंडात चांगला परतावा मिळत असल्याने त्यातील गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. या फंडांतील गुंतवणूक काढून घेतली जाईल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. कारण या फंडांकडे मोठी गंगाजळी असून, दर महिन्याला ‘एसआयपी’च्या माध्यमातून त्यात निरंतर भर पडत आहे.

– जय शहा, संस्थापक, ‘फिनवाइजर’

हे निवडणुकीचे वर्ष असल्याने बाजाराकडून लार्ज कॅप फंडावर भर दिला जात आहे. यामुळे स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडातील गुंतवणूक अल्पकाळासाठी कमी झालेली दिसेल. गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टिकोनातून जास्त परताव्यामुळे या फंडांना प्राधान्य देतील. आगामी काळात मिड कॅप फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे. – निकेत शहा, फंड व्यवस्थापक, मोतीलाल ओसवाल एएमसी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi concerns over investment flow increase in small cap and mid cap funds print eco news zws
Show comments