मुंबई : भाडेतत्त्वावर हॉटेल आणि खोल्या उपलब्ध करून देणारी नाममुद्रा ‘ओयो हॉटेल्स’ची प्रवर्तक कंपनी ‘ओरव्हेल स्टेज’ला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी पुन्हा नव्याने मसुदा प्रस्ताव सादर करण्याचे मंगळवारी निर्देश दिले. यामुळे ‘ओयो हॉटेल्स’ची समभाग विक्रीची योजना पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ओयो हॉटेल्स’ने सप्टेंबर २०२१ मध्ये सेबीकडे प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’च्या माध्यमातून ८,४३० कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी प्रस्ताव (डीआरएचपी) सादर केला होता. त्या माध्यमातून ७,००० कोटी रुपयांचे नवीन समभाग तर विद्यमान भागधारकांकडील आंशिक हिस्सा विक्रीच्या माध्यमातून १,४३० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.

मंगळवारी संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, नियामकांनी ३० डिसेंबर २०२२ रोजी कंपनीचा मसुदा प्रस्ताव परत पाठविला असून, अद्ययावत स्वरूपात नव्याने प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. मात्र सेबीने मसुदा दस्तऐवजांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत याबाबत माहिती दिलेली नाही.

आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ६३ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे. त्या आधीच्या वर्षात याच कालावधीत २८० कोटी रुपयांचा तोटा कंपनीला झाला होता. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर २४ टक्क्यांनी वाढून २,९०५ कोटी रुपये झाला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi directed oyo to submit new draft proposal asj