मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने अर्थविषयक वृत्तवाहिनीच्या माजी निवेदकाला १ कोटी रुपयांचा दंड बुधवारी ठोठावला. शिवाय त्याच्यासह, इतर आठ जणांना पाच वर्षांसाठी शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली. संबंधित वाहिनीच्या एका कार्यक्रमातून स्वहित दडलेल्या गुंतवणुकीचे सल्ले आणि व्यवहार करण्यास उद्युक्त केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> विमा कंपन्यांना पॉलिसीच्या बदल्यात कर्ज देणे बंधनकारक – इर्डा
‘सेबी’ने माजी वृत्तनिवेदक प्रदीप पंड्या आणि तांत्रिक विश्लेषक अल्पेश वासनजी फुरिया यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा आणि उर्वरित सहा संस्थांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. येत्या ४५ दिवसांत हा दंड भरण्याचे निर्देश दिले गेले आहेत. वृत्तवाहिनीच्या ‘पंड्या का फंडा’ या कार्यक्रमाद्वारे फसव्या हेतूने केल्या गेलेल्या शिफारशींची छाननी केली असता हे कारवाईचे पाऊल उचलले गेले. अल्पेश फुरिया आणि प्रदीप पंड्या यांच्यासह संलग्न कंपन्यांनी या फसव्या व्यवहारातून बेकायदेशीररीत्या कमावलेला १०.८३ कोटी रुपयांचा नफादेखील जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यापैकी ८.३९ कोटी रुपये त्यांनी सेबीच्या ऑक्टोबर २०२१ च्या अंतरिम आदेशावेळी आधीच जमा केले आहेत. त्यामुळे त्यांना उर्वरित २.४४ कोटी रुपये आता १२ टक्के व्याजासह नियामकाकडे जमा करावे लागतील. प्रदीप पंड्या यांच्या ‘पंड्या का फंडा’ या कार्यक्रमात ‘बाय-टुडे-सेल-टुमारो’ (बीटीएसटी) आणि ‘इंट्रा-डे’ व्यवहारांसाठी केल्या गेलेल्या समभाग शिफारशींमध्ये त्यांचेच हितसंबंध आढळून आले आहेत. पंड्या हे २०२१ पर्यंत वाहिनीवर विविध कार्यक्रम चालवत होते, तर अल्पेश फुरिया या कार्यक्रमात अतिथी विश्लेषक म्हणून येत होते आणि समाजमाध्यमाद्वारेदेखील समभाग शिफारसी त्यांनी दिल्या आहेत.