मुंबई: आघाडीची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाची विमा क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) मंगळवारी हिरवा कंदिल मिळाला.
इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स आयपीओच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. तर आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून (ओएफएस) प्रवर्तकांकडील १४.१२ कोटी समभाग विकण्यात येतील. मुख्य प्रवर्तक असलेली बँक ऑफ बडोदा तिच्या मालकीचे ८.९ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. तर कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया अनुक्रमे ३.९२ कोटी आणि १.३ कोटी समभाग विकून त्यांची हिस्सेदारी सौम्य करणार आहेत.
‘आयपीओ’च्या माध्यमातून मिळणारा निधी मुख्यतः भांडवली विस्ताराच्या योजनांवर खर्चासाठी वापरण्यात येणार आहे. सध्या इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्समध्ये बँक ऑफ बडोदाची सर्वाधिक ६५ टक्के हिस्सेदारी आहे, तर कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट इंडियाची २६ टक्के आणि युनियन बँक ऑफ इंडियाची सुमारे ९ टक्के हिस्सेदारी आहे.
‘इंडियाफर्स्ट लाइफ’ ही आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतातील सर्वात वेगाने वाढणारी खासगी आयुर्विमा विमा कंपनी असल्याचा दावा ‘क्रिसिल’च्या अहवालात करण्यात आला आहे.
कंपनीची कामगिरी कशी?
मार्च २०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला २८१.६२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर त्याआधीच्या वर्षात कंपनीने ३०.१९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रीमियमच्या माध्यमातून ४,९८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते, जे आधीच्या वर्षाच्या तुलनेत २७.८ टक्क्यांनी अधिक राहिले आहे.