Body JSW Cement IPO: सीमेंट क्षेत्रात सध्या चांगलीच धामधूम सुरू आहे. जेएसडब्ल्यू समूहाचा भाग असलेली ही कंपनी या क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी असून ती आयपीओच्या किंवा प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून भांडवल उभारणीस सज्ज झाली आहे. नुकताच कंपनीला बाजार नियंत्रक असलेल्या सेबीकडूनही ४ हजार कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी मिळाली आहे. जर जेएसडब्ल्यू सीमेंटच्या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या ११ गोष्टी नक्की वाचा…
JSW Cement IPO: आयपीओचा आकार किती आहे?
या आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा ४ हजार कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे. नवे शेअर्स देणं तसेच सध्याच्या गुंतवणूकदारांच्या शेअर्सची विक्री करणं अशा दोन्हींचा यात समावेश आहे. नव्या शेअर्सच्या माध्यमातून २ हजार कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेलच्या (OFS) म्हणजे अस्तित्वात असलेल्या शेअर्सच्या विक्रीच्या माध्यमातून २ हजार कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत.
JSW Cement IPO: ओएफसमध्ये सहभागी महत्त्वाचे गुंतवणूकदार
जेएसडब्ल्यू सीमेंटमध्ये काही गुंतवणूकादारांची आधीच केलेली गुंतवणूक असून ते आपले शेअर्स विक्री करत आहेत. यामध्ये एपी एशिया ऑपॉरर्च्युनिस्टिक होल्डिंग्ज ९३७.५ कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहे. सिनर्जी मेटल्स इन्व्हेस्टमेंट्स होल्डिंग्जही ९३७.५ कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाही १२५ कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहे.
JSW Cement IPO: कुणाला किती शेअर्स मिळणार
आयपीओमधील शेअर्स विविध गुंतवणूकदारांमध्ये विभागून विकले जातात. ५० टक्के शेअर्स क्वालिफाइड इन्स्टिस्ट्युशनल इन्व्हेस्टर्स (QIBs), १५ टक्के असंस्थात्मक किंवा नॉन इन्स्टिस्ट्युशनल इन्व्हेस्टर्स (NIIs) आणि ३५ टक्के शेअर्स रिटेल इन्व्हेस्टर्स किंवा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ठेवण्यात आले आहेत.
JSW Cement IPO: उभारलेल्या भांडवलाचा विनियोग कसा करणार?
या आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा वापर कर्ज कमी करण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे. राजस्थानातील नागौर येथे ८०० कोटी रुपये खर्च करून कारखाना उभारण्याचा प्रस्ताव आहे. तर ७२० कोटी रुपये कर्जाचा भार हलका करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. उरलेला निधी अन्य व्यावसायिक कामासाठी वापरण्याचा कंपनीचा विचार आहे.
JSW Cement IPO: कंपनीची कर्जाची काय स्थिती आहे?
मार्च ३१, २०२४ पर्यंत जेएसडब्ल्यू सीमेंटचं एकूण कर्ज ८,९३३.४२ कोटी रुपये आहे. यामध्ये अल्पकालीन व दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे.
JSW Cement IPO: आयपीओ टाइमलाइन काय आहे?
ताज्या अपडेटनुसार आयपीओ नक्की कुठल्या तारखेला उघडेल हे जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु तो लवकरच बाजार येईल असे सांगण्यात आले आहे.
JSW Cement IPO: आयपीओ नोंदणीची प्रक्रिया
आयपीओची प्रक्रिया संपली की बीएसई व एनएसई दोन्ही बाजारांमध्ये या कंपनीच्या शेअर्सची नोंदणी होईल. त्यानंतर गुंतवणूकादारांना शेअर्सची खरेदी व विक्री थेट करता येईल.
JSW Cement IPO: आयपीओमागे असलेल्या आघाडीच्या इन्व्हेस्टमेंट बँका
हा आयपीओ अनेक आघाडीच्या वित्तसंस्था हाताळत आहेत. यामध्ये जेएम फायनान्शिअल, अॅक्सिस कॅपिटल, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, गोल्डमन साक्स (इंडिया) सेक्युरिटीज आणि जेफ्रीज इंडिया यांचा समावेश आहे.
JSW Cement IPO: गेल्या दशकभरात कंपनीची झालेली वाढ
क्रिसिलच्या अहवालानुसार, २०१४ ते २०२० या आर्थिक वर्षांच्या कालावधीत सीमेंट उत्पादन क्षेत्रात सगळ्यात झपाट्याने या कंपनीची वाढ झालेली आहे. यामध्ये ग्राइंडिंग कपॅसिटी व विक्रीचे आकडे हा निकष बघितला आहे. २०२२-२३ या वर्षात कंपनीची विक्री ३१.११ टक्क्यांनी वाढली, जेव्हा या क्षेत्राची वाढ ६.३५ टक्के होती. त्यानंतर २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये जेएसड्ब्लयू सीमेंटची इन्स्टॉल्ड ग्राइंडिंग कपॅसिटी व विक्री अनुक्रमे १४.१४ टक्के व १९.०६ टक्के चक्रवाढ गतीने (CAGR) वाढली आहे.
JSW Cement IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम काय आहे?
कंपनीने सादर केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्सनुसार कंपनीने दिलेल्या काही जोखमी अशा आहेत… “कारखाना चालवण्यासाठी आवश्यक लाइमस्टोन मिळवण्याच्या कंपनीच्या क्षमतेवर हा व्यवसाय अवलंबून आहे. जर, योग्य प्रकारे तो मिळवता आला नाही तर त्याचा आर्थिक गणितांवर व एकूणच व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो.” “आम्ही ब्लास्ट फरनेस स्लागसाठी जेएसड्ब्लयू स्टील व तिच्या उपकंपन्यांवर चांगलेच अवलंबून आहोत. जे अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल आहे. जर या पुरवठादारांमध्ये खंड पडला तर त्याचा आर्थिक तसेच एकूण व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो.” “अखंडित व पुरेसा वीजपुरवठा व इंधन ही या व्यवसायाची गरज आहे. जर यामध्ये खंड पडला तर त्याचा परिणाम कंपनीच्या कामकाजावर होऊ शकतो.”
JSW Cement IPO: कंपनीची एकंदर अवस्था काय आहे?
जेएसड्ब्लयू सीमेंट २००९ मध्ये स्थापन करण्यात आली असून ती मुंबईस्थित जेएसडब्ल्यू समूहाची उपकंपनी आहे. कंपनी सीमेंटशी संलग्न उत्पादने बनवते तर समूह पोलाद, उर्जा, पायाभूत सुविधा, रंग व क्रीडा या क्षेत्रांमध्ये आहे.