मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने बुधवारी व्यवसायसुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त म्युच्युअल फंड खात्यांसाठी नामनिर्देशन (नॉमिनेशन) पर्यायी केले आहे. मात्र सर्व विद्यमान वैयक्तिक म्युच्युअल फंड खातेधारकांसाठी नामांकन करणे आवश्यक असेल. याबरोबरच, सेबीने फंड घराण्यांना कमॉडिटी आणि परदेशी गुंतवणुकीवर देखरेखीसाठी एकच फंड व्यवस्थापक ठेवण्याची परवानगी दिली. यामुळे निधी व्यवस्थापनाचा खर्च कमी होण्यास मदत होईल.
म्युच्युअल फंडांसाठी नामांकनाची आवश्यकता संयुक्तपणे उघडल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंड फोलिओसाठी पर्यायी असेल, असे ‘सेबी’ने परिपत्रकात म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, संयुक्त धारकांसाठी नामांकन आवश्यकता शिथिल करणे फायदेशीर आहे. कारण एका सदस्याचा आकस्मित मृत्यू झाल्यास दुसरा सदस्य नामनिर्देशित व्यक्ती नियुक्त करू शकतो. हयात असलेल्या सदस्याला नामनिर्देशित करण्याची परवानगी देऊन नामांकन प्रक्रिया सुलभ होईल.
हेही वाचा >>> सार्वजनिक गुंतवणूक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची चालक: आयएमएफ
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नामनिर्देशन पत्र (नॉमिनेशन) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच सेबीने ३० जून २०२४ ही सर्व विद्यमान वैयक्तिक म्युच्युअल फंड खातेधारकांसाठी नामांकन करण्यासाठी किंवा नामांकन रद्द करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित केली आहे. या कालावधीत नामांकन करण्यास अयशस्वी ठरल्यास, म्युच्युअल फंड खाती गोठवली जातील. त्यामुळे म्युच्युअल फंडधारकांना पैसे काढता येणार नाही.
सेबीने स्पष्ट केले की, गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड), सिल्व्हर ईटीएफ आणि कमॉडिटी मार्केटमध्ये भाग घेणारे इतर फंड यांसारख्या कमॉडिटी-आधारित फंडांसाठी, समर्पित फंड व्यवस्थापकाची नियुक्ती वैकल्पिक असेल. तसेच, परदेशातील गुंतवणूक करण्यासाठी समर्पित निधी व्यवस्थापकाची नियुक्ती ऐच्छिक असेल. देशांतर्गत आणि परदेशी/कमॉडिटी फंडांसाठी एकाच फंड व्यवस्थापकाची नियुक्ती हा निधी व्यवस्थापित करण्याचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने आहे.
हेही वाचा >>> LPG Cylinder Price Drop: निवडणुकीच्या रणधुमाळीत गॅस सिलिंडरची किंमत उतरली; १ मे पासून नवा दर लागू, पाहा
म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन म्हणजे काय?
नामनिर्देशन अशी प्रक्रिया असते ज्यात तुमचा मृत्यू झाल्यास तशा प्रसंगी तुमच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती करण्याची सुविधा आहे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड योजनेसाठी नामनिर्देशित व्यक्तीची नोंद करू शकता. नामनिर्देशित व्यक्ती कोणीही व्यक्ती असू शकते – कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या विश्वासातील इतर कोणीही व्यक्ती. तुम्हाला नामनिर्देशित व्यक्तीची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. कारण तुमचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी तुमच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी ती व्यक्ती विश्वासार्ह आणि पात्र असावी लागते.