मुंबई: भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या संचालक मंडळ सदस्यांना कोणताही हितसंबंधांचा संघर्ष (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) असेल तर त्याचे वेळीच सार्वजनिकरित्या प्रकटीकरण करावे लागेल, असे तिचे नवीन अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी शुक्रवारी येथे सुस्पष्टपणे प्रतिपादन केले. यासाठी लवकरच एक सुव्यवस्थित चौकट आखली जाईल, असेही त्यांनी सूचित केले.

अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात, पांडे म्हणाले की नियामकांची विश्वासार्हता आणि पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल आवश्यक ठरेल. गेल्या वर्षी हिंडेनबर्ग रिसर्चने पांडे यांच्या पूर्वसुरी माधवी पुरी बुच यांच्यावर जागल्याकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे संभाव्य हितसंबंधांच्या संघर्षाशी निगडित अनेक आरोप केले होते. हितसंबंध गुंतल्यामुळे त्यांनी अदानी प्रकरणी चौकशीत हयगय केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या पार्श्वभूमीवर पांडे यांची वरील ग्वाहीला विशेष अर्थ प्राप्त होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुच यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये एका विदेशातील फंडात त्यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीचा समावेश होता जेथे, अदानी समूहाशी संलग्न कंपनीदेखील सह-गुंतवणूकदार होती. असे हितसंबंध गुंतले असताना, बूच यांच्या नेतृत्वात ‘सेबी’कडून निष्पक्षपणे चौकशी कशी केली जाईल, असा प्रश्नही उपस्थित केला गेला होता. या आरोपांना उत्तर देताना, अदानी समूहावरील आरोपांची योग्य चौकशी करण्यात आल्याचे सेबीने नमूद केले होते. शिवाय बुच यांनी ‘संबंधित प्रकटीकरण’ वेळीच केले होते आणि आवश्यकतेनुसार स्वतःला चौकशी प्रक्रियेपासून दूरही केले होते, असाही खुलासा करण्यात आला होता.

अलीकडेच म्हणजे १ मार्चपासून बुच यांच्या जागी आलेले पांडे म्हणाले, सेबीच्या संचालक मंडळातील सदस्यांच्या हितसंबंधांच्या संघर्षासह इतर विविध उपाययोजनांवर अधिक पारदर्शक राहण्याला त्यांच्या लेखी सर्वोच्च प्राधान्य असेल. हितसंबंधांच्या संघर्षांना अधिक पारदर्शकपणे जनतेसमोर प्रकट होतील यासाठी स्वतःची योजना घेऊन लवकरच पुढे येणार आहोत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

परदेशी गुंतवणूकदारांचे अधिक तर्कसंगत नियमन

परदेशी गुंतवणूकदार वेगाने बाहेर रस्ता धरत असल्याबद्दल व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सेबीप्रमुख पांडे म्हणाले भांडवली बाजार नियामक त्यांच्या कामकाजाचे नियमन अधिक तर्कसंगत करू पाहत आहे. ते म्हणाले, परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे आम्ही जाणतो. असे गुंतवणूकदार आणि उद्योग सहभागींशी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांचे येथील व्यवहार सुलभ करण्यासाठी अनावश्यक आणि कालबाह्य नियमांवर पुनर्विचार करण्याच्या तयारीसह, संबंधितांशी संवादही साधला जाईल. भारत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उज्ज्वल ठिकाण आहे आणि आपल्याला देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही भांडवल गरजेचे आहे, असे ते म्हणाले.