पीटीआय, नवी दिल्ली
नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या संचालकांसाठी सुयोग्य व्यक्तीची निवड करणाऱ्या वित्तीय सेवा संस्थात्मक मंडळाने (एफएसआयबी), स्टेट बँक अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवारांची मंगळवारी होणारी मुलाखत अचानक पुढे ढकलली. यामागील नेमके कारणही स्पष्ट करण्यात आले नाही.
स्टेट बँकेच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्याचे नियोजन होते. मात्र, अचानक या मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागल्यानंतर केंद्रात नवीन सरकार सत्तेत येईल आणि त्यानंतर मुलाखतीची तारीख निश्चित केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: मतदानानंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा मोठा बदल, १० ग्रॅमचे दर ऐकून ग्राहकही…
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिनेश खरा यांच्या जागी प्रथेनुसार, स्टेट बँकेच्या सध्या कार्यरत पात्र व्यवस्थापकीय संचालकांपैकी एकाची वर्णी लागणार असून, त्यांच्याच मुलाखती मंगळवारी घेतल्या जाणे अपेक्षित होते. खरा हे येत्या २८ ऑगस्ट रोजी बँकेच्या अध्यक्षपदावरूनही सेवानिवृत्त होत आहेत. स्टेट बँकेच्या अध्यक्षपदासाठी निर्धारीत ६३ वर्षे ही सर्वोच्च वयोमर्यादा त्यांच्याकडून तेव्हा गाठली जाणार असल्याने खरा यांना अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.
मंडळाकडून मुलाखतीपश्चात पात्र उमदेवाराच्या नावाची शिफारस केली जाईल आणि अंतिम निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती घेणे अपेक्षित आहे. एफएसआयबी मंडळाचे प्रमुख भानू प्रताप शर्मा, हे केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे माजी सचिव आहेत. सरकारने नियुक्त केलेल्या निवड मंडळाचे सदस्य वित्तीय सेवा सचिव, सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. मंडळाच्या इतर सदस्यांमध्ये पूर्वाश्रमीच्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिमेश चौहान, रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक दीपक सिंघल आणि पूर्वाश्रमीच्या आयएनजी वैश्य बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र भंडारी यांचा समावेश आहे.