वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत असलेल्या ठेवी ७४,६२५ कोटींवर पोहोचल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत जमा २८,७१५ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात यंदा १६० टक्क्यांची वाढ झाली आहे.
मागील केंद्रीय अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा १५ लाखांवरून ३० लाख रुपये केली होती. परिणामी, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत गंगाजळी ७४,६२५ लाख कोटींवर पोहोचली आहे. याचबरोबर, एकल खात्यांसाठी मासिक उत्पन्न खाते योजनेची मर्यादा ४.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी ९ लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत ८.२ टक्के दराने व्याज मिळते. अल्पबचत योजनांवरील व्याजाचा उच्च दर आणि वाढलेली कमाल ठेव मर्यादा यामुळे या योजनांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा… ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना १ लाख कोटींच्या वसुलीच्या नोटिसा
सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्रदेखील सादर केले आहे. ज्याअंतर्गत महिलांना किमान एक हजार रुपयांची व त्यानंतर शंभर रुपयांच्या पटीत जास्तीतजास्त दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्राअंतर्गत आतापर्यंत १३,५१२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
हेही वाचा… भारत-जपान सेमीकंडक्टर पुरवठा कराराला मंजुरी
केंद्र सरकारने विद्यमान आर्थिक वर्षात अल्पबचत योजनांच्या अंतर्गत ४.७१ लाख कोटी रुपयांच्या संकलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे.