प्राप्तिकर भरण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिकांनी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त प्राप्तिकर भरला आहे. हे मागील वेळेपेक्षा ३५.५ टक्के अधिक आहे. २०२१-२२ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कर संकलनात केवळ ५ टक्के वाढ झाली आहे. २०१९-२० च्या तुलनेत कोरोनाच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत यावेळी प्राप्तिकर संकलनात ज्येष्ठ नागरिकांचे योगदान ६१ % पेक्षा जास्त आहे. २०२२-२३ मध्ये प्राप्तिकर संकलन अंदाजापेक्षा १७ टक्के जास्त होते. १६.६१ लाख कोटी रुपयांच्या प्राप्तिकर संकलनात वैयक्तिक करदात्यांचा वाटा २४ टक्के आहे. करोना काळात शेअर्सचे मूल्य खूपच कमी असताना हे पैसे बँकांमधून काढून शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले गेलेत. नंतर शेअर बाजारात मोठी तेजी आली. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी जास्त किमतींवर नफा कमावला, त्यांच्याकडूनच हा भांडवली नफा कर जमा करण्यात आला आहे. त्याचा परिणाम करवसुलीवरही दिसून आला. २०२२-२३ या आर्थिक वर्षात करदात्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ७३.१ लाखांवरून १८.६ टक्क्यांनी वाढून ८६.७१ लाख झाली आहे.
पेन्शनची मोठी थकबाकी आणि कर नियमांमध्ये बदल
निवृत्त सैनिकांना वन रँक-वन पेन्शन अंतर्गत सुमारे ५७ हजार कोटी रुपयांची थकबाकी मिळाली आहे. भांडवली नफा आणि लाभांश करातील वाढ आणि शेअर बाजारातील वाढ हीही प्रमुख कारणे होती. तसेच प्राप्तिकरदात्यांना नवीन कर व्यवस्था मिळाली आहे. नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्यांसाठी सवलत मर्यादा ७ लाख रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ती ५ लाख रुपये होती. पगारदार वर्गाला अर्थसंकल्पात आणखी एक दिलासा देण्यात आला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ५०,००० रुपयांच्या मानक वजावटीचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही. जुन्या कर प्रणालीतील कराचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील.
”बँकांमधून पैसे काढून शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवले”
“हा अतिशय चांगला डेटा आहे आणि या घटनेची कारणमीमांसा करणं तसं कठीण आहे, परंतु कामाचे विविध प्रकारचे स्रोत असू शकतात, त्यातून हा कर आला असावा,” असे करतज्ज्ञ कुलदीप कुमार म्हणालेत. तर २०२० नंतर लाभांश करात झालेल्या बदलामुळे अनेक गुंतवणूकदारांनी यावर्षी कर भरला. गेल्या काही वर्षांत एफडीवरील परतावा खूपच कमी आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी बँकांमधून पैसे काढून शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवले. त्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला, म्हणून त्यांनी कर स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे भरले आहेत, असंही नांगिया अँडरसनचे करतज्ज्ञ अरविंद श्रीवत्सन यांनी सांगितले.
हेही वाचाः पराग अग्रवालसह टॉप ३ माजी ट्विटर अधिकाऱ्यांनी एलॉन मस्कविरोधात दाखल केला खटला, ‘हे’ आहे कारण