लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू झालेला निधीचा ओघ आणि बँक समभागांमधील खरेदीचा सपाटा यामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारच्या सत्रात सुमारे १ टक्क्यांनी वधारले. सलग पाचव्या तेजीच्या सत्रामुळे सेन्सेक्सने ७७,००० पातळीकडे मार्गक्रमण केले आहे.
सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५७.४५ अंशांनी वधारून ७६,९०५.५१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६९३.८८ अंशांची झेप घेत ७७,०४१.९४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५९.७५ अंशांची वाढ झाली आणि तो २३,३५०.४० पातळीवर स्थिरावला.देशांतर्गत बाजाराने आठवड्याच्या अखेरच्या दिवशी तेजी कायम राखली. जोखीममुक्त घडामोडींमध्ये अपेक्षित घट आणि डॉलर निर्देशांकातील घसरण यामुळे उदयोन्मुख देशांकडे पुन्हा परकीय निधीचा प्रवाह परतू लागला आहे. फेडरल रिझर्व्हच्या नकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले आहेत. अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने चालू वर्षात दोनदा व्याजदर कपातीची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात आशावाद निर्माण झाला आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्र बँक, ॲक्सिस बँक, नेस्ले, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड आणि झोमॅटो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर इन्फोसिस, टाटा स्टील, महिंद्र अँड महिंद्र, टायटन आणि बजाज फिनसर्व्हच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ३,२३९.१४ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
सेन्सेक्स – ७६,९०५.५१ ५५७.४५ ( ०.७३%)
निफ्टी – २३,३५०.४० १५९.७५ ( ०.६९%)
तेल – ७१.८५ – ०.२१%
डॉलर – ८६ -३६ पैसे