लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतापायी देशांतर्गत भांडवली बाजारावर तेजीवाल्यांनी पकड मजबूत केली असून, परिणामी मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक वाढीसह स्थिरावले. दूरसंचार, तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली. मात्र जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय तणावामुळे परदेशी गुंतवणुकीचा ओघ ओसरला आहे.
मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८९.८३ अंशांनी वधारून ७३,७३८.४५ पातळीवर बंद झाला. सत्रादरम्यान, तो ४११.२७ अंशांनी वधारून ७४,०५९.८९ या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३१.६० अंशांची भर पडली आणि तो २२,३६८ पातळीवर स्थिरावला.
हेही वाचा >>>रिलायन्सला ६९,६२१ कोटींचा विक्रमी वार्षिक नफा; उलाढालीत १० लाख कोटींचा टप्पा गाठणारी पहिलीच कंपनी
देशांतर्गत भांडवली बाजारात मर्यदित पातळीत व्यवहार सुरू होते. इराण-इस्रायलमधील तणावातील वाढीमुळे मध्यंतरी खनिज तेलाचे भाव वधारले होते आणि भावातील अस्थिरता यापुढे कायम राहणे अपेक्षित आहे. बरोबरीने डॉलर निर्देशांकांतील आणि अमेरिकी रोख्यांवरील परतावा दरात वाढ तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून निधीचे पुनर्गमन कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ वाढल्याने बाजारात तेजीवाल्यांनी पकड घट्ट करता आली आहे, असे निरीक्षण जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, नेस्ले, मारुती, टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एनटीपीसी, एशियन पेंट्स आणि स्टेट बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर याउलट, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र अँड महिंद्र, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्र आणि बजाज फायनान्सच्या समभागात घसरण झाली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात नफावसुलीमुळे समभाग एक टक्का घसरणीसह २,९१८.५० रुपयांवर बंद झाला. परिणामी एकंदर बाजारावर विक्रीचा दबाव वाढला आणि निर्देशांकांच्या मुसंडीलाही वेसण घातले गेले.
सेन्सेक्स ७३,७३८.४५ ८९.८३ (०.१२%)
निफ्टी २२,३६८ ३१.६० (०.१४%)
डॉलर ८३.३३ -३
तेल ८७.३६ ०.४१