मुंबई : निरंतर गटांगळ्या खात असलेल्या मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल मंगळवारी प्रथमच ४०० लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले असून, सेन्सेक्सने एक दिवसापुरती सकारात्मकता दाखवून पुन्हा घसरणीचा क्रम सुरू ठेवला. परिणामी बाजारात मागील दहापैकी सलग आठ सत्रात झालेली उतरंड पाहता मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतल्याचेच दाखवून दिले आहे.

मुंबई शेअऱ बाजारातील सर्व कंपन्यांचे बाजार भाडंवल याआधी ४ जून २०२४ मध्ये ३९४ लाख कोटी रुपयांवर होते. आता निरंतर घसरणीनंतर मंगळवारी ते ३९८ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.मुख्यतः परदेशी निधीचे निर्गमन आणि कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत मिळकत कामगिरीमुळे भांडवली बाजारात गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रात पुन्हा ७६,००० अंशांच्या पातळीखाली घसरला आहे.

मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९.४७ अंशांनी घसरून ७५,९६७.३९ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने ४६५.८५ अंश गमावत ७५,५३१.०१ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४.२० अंशांची किरकोळ घसरण झाली आणि तो २२,९४५.३० पातळीवर स्थिरावला. निफ्टीला सत्रात २३,००० अंशांची पातळी देखील गाठता आली नाही.

परदेशी गुंतवणूकदारांच्या अर्थात एफआयआयच्या देशांतर्गत भांडवली बाजारातून होणाऱ्या निर्गमनामुळे चिंता वाढली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण सुरूच आहे, परिणामी चलनावर दबाव असल्याने देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदार नफावसुलीला प्राधान्य देत आहेत. तर दुसरीकडे काही गुंतवणूकदार बाजार तळाला पोहोचल्याने खरेदी देखील करत आहेत. मूल्यांकनांबद्दल चिंतेमुळे व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण सुरू आहे. दरम्यान, देशांतर्गत चलनाचे अवमूल्यन आणि वाढत्या कमॉडिटी किमतींमुळे आयात मूल्य वाढले आहे. त्या परिणामी भारताची व्यापार तूट अपेक्षेपेक्षा अधिक वाढली आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये, इंडसइंड बँक, महिंद्र अँड महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयटीसी आणि एशियन पेंट्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर एनटीपीसी, झोमॅटो, टेक महिंद्र, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्र बँक आणि एचसीएल टेकचे समभाग तेजीसह स्थिरावले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवरीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३,९३७.८३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ७५,९६७.३९ -२९.४७ -०.०४%

निफ्टी २२,९४५.३० -१४.२० – ०.०६%

तेल ७५.७७ ०.७३%

डॉलर ८६.९६ ८ पैसे

Story img Loader