लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: भांडवली बाजारातील बुधवारच्या सत्रात मोठी उलटफेर होत, सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक त्यांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर, तब्बल १ टक्क्यांहून अधिक गडगडले. बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याचा सर्वाधिक फटका हा मिड-कॅप समभागांना बसला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३०.८८ अंशांनी घसरून ७०,५०६.३१ पातळीवर स्थिरावला. सत्रात सेन्सेक्सने ४७५.८८ अंशांची कमाई करत ७१,९१३.०७ हे सर्वोच्च शिखर गाठले होते. मात्र मध्यान्हानंतर दुपारच्या सत्रात नफावसुलीसाठी सुरू झालेल्या समभाग विक्रीचा माऱ्यामुळे विक्रमी उच्चांकावरून खाली येत सेन्सेक्सने ७०,३०२.६० ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३०२.९५ अंशांनी घसरून २१,११५०.१५ पातळीवर विसावला. दिवसभरात तो १३९.९ अंशांनी वाढून २१,५९३ या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.
हेही वाचा >>>शेअर बाजारातील तेजीला ब्रेक! सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला, करोनाच्या नव्या व्हेरियंटचा परिणाम?
जागतिक पातळीवर सकारात्मक कल असूनही, दुसऱ्या सत्रात देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदारांनी अचानक समभाग विक्रीचा मारा केला. मिड आणि स्मॉल-कॅप समभागांचे मूल्यांकन वाढवणाऱ्या अलीकडील तीव्र कलामुळे गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. अलीकडील वाढत्या खनिज तेलाच्या चिंतेने गुंतवणूकदारांना नफावसुली करण्यास प्रवृत्त केले, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये केवळ एचडीएफसी बँकेला समभाग वगळता सर्व कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. टाटा स्टील सर्वाधिक ४.२१ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ एनटीपीसी, टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, पॉवर ग्रिड, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे समभागही घसरले.
गुंतवणूकदारांच्या ९.१ लाख कोटी संपत्तीचा ऱ्हास
निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस या आघाडीच्या समभागांनी घसरणीला हातभार लावला. परिणामी बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ९.११ लाख कोटींनी आटले. ते मंगळवारच्या सत्रातील ३५९.११ लाख कोटींवरून खाली येत ३५०.०१ लाख कोटींवर स्थिरावले.
बाजार आकडेवारी
सेन्सेक्स ७०,५०६.३१ -९३०.८८ (-१.३०)
निफ्टी २१,५९३ -१३९.९ (-१.४१)
डॉलर ८३.१८ —
तेल ७९.८३ ०.७६