लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने शुक्रवारी ५५६ अंशांची मुसंडी घेत दोन महिन्यातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. सकारात्मक जागतिक संकेत आणि देशांतर्गत घडामोडींमुळे ऊर्जा, धातू आणि तेल कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. परिणामी निफ्टी देखील १९,४०० अंशांच्या पातळीवर स्थिरावला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५५.७५ अंशांनी वधारून ६५,३८७.१६ पातळीवर बंद झाला. त्यातील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १८१.५० अंशांची भर घातली आणि तो १९,४३५.३० पातळीवर स्थिरावला.
आणखी वाचा-निर्मिती क्षेत्र वेगवान! ऑगस्टमध्ये तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर
अनुकूल जागतिक संकेत, देशांतर्गत उत्पादन निर्देशांक पीएमआयची उल्लेखनीय वाढ आणि सकारात्मक सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण होते. भारतीय अर्थव्यवस्था जून तिमाहीत ७.८ टक्के वेगाने वाढली. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. या मजबूत आर्थिक दृष्टिकोनामुळे प्रमुख उत्पादन क्षेत्रांतील समभागांनी बाजारातील तेजीचे नेतृत्व केले, तर वाहन निर्मात्या कंपन्यांच्या वाढलेल्या विक्रीमुळे वाहन कंपन्यांचे समभाग वधारले. शिवाय जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक सुरुवातीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना टिकून राहिली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये एनटीपीसीचा समभाग ४.८४ टक्क्यांच्या तेजीसह अग्रस्थानी राहिला. त्यापाठोपाठ जेएसडब्ल्यू स्टील (३.३७ टक्के), टाटा स्टील (३.३३ टक्के), मारुती (३.२४ टक्के), पॉवर ग्रिड (३.०७ टक्के), इंडसइंड बँक (२.९५ टक्के), बजाज फायनान्स (२.१२ टक्के) आणि टेक महिंद्रा (२.१० टक्के) तेजी दर्शवीत होते. तर अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, नेस्ले आणि लार्सन अँड टुब्रोच्या समभागात घसरण झाली.
सेन्सेक्स ६५,३८७.१६ ५५५.७५ ( ०.८६)
निफ्टी १९,४३५.३० १८१.५० ( ०.९४)
डॉलर ८२.७०
तेल ८७.९२ १.२६