मुंबई: जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या कमी झालेल्या किमतीमुळे निर्देशांकात सर्वाधिक योगदान देणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये केलेल्या खरेदीच्या जोरावर प्रमुख निर्देशांक वधारले. परिणामी सेन्सेक्सने ६१० अंशांच्या उसळीसह ७४ हजारांची पातळी पुन्हा सर केली, तर निफ्टी देखील २२,५०० अंशांपुढे बंद झाला.
गुरुवारच्या सत्रात सुरुवातीच्या घसरणीतून सावरत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेरीस ६०९.८६ अंशांनी वधारून ७४,३४०.०९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६६०.५७ अंशांची वाढ नोंदवत ७४,३९०.८० या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २०७.४० अंशांची भर घातली आणि तो २२,५४४.७० वर बंद झाला.
कमकुवत डॉलर निर्देशांकाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोच्या वाहन उत्पादकांवरील व्यापार धोरण शिथिल केले. त्यानंतर सकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्थानिक बाजारातील निर्देशांक सावरले. मागणीतील मंदी आणि चीनकडून येणाऱ्या आर्थिक प्रोत्साहनामुळे खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने ऊर्जा आणि धातू क्षेत्रात आशावाद निर्माण झाला आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, एशियन पेंट्स, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मास्युटिकल्स, अदानी पोर्ट्स अँड सेझ, ॲक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन आणि बजाज फायनान्स यांचे समभाग वधारले. तर टेक महिंद्र, कोटक महिंद्र बँक, झोमॅटो, टाटा मोटर्स आणि इंडसइंड बँकेच्या समभागात घसरण झाली.
व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे १.६३ टक्के आणि ०.६५ टक्क्यांनी वधारले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, ऊर्जा, धातू, तेल आणि वायू, सेवा क्षेत्र, वीज, आरोग्यसेवा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारले. मात्र बाजार तेजीत दूरसंचार आणि गृहनिर्माण क्षेत्र नकारात्मक राहिले.
सेन्सेक्स ७४,३४०.०९ ६०९.८६ ( ०.८३%)
निफ्टी २२,५४४.७० २०७.४० ( ०.९३%)
तेल ६९.६६ ०.५२%
डॉलर ८७.१२ ६ पैसे