मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टीसीएस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या पहिल्या तिमाहीच्या कमाईसह दिवसाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्थेविषयक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. परिणाम सलग तीन सत्रांतील तेजीला लगाम लागला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२३.९४ अंशांची (०.३४ टक्के) घसरून ६५,३९३.९० पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६५,३२०.२५ अंशांची नीचांकी तर ६५,८११.६४ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५५.१० अंशांची (०.२८ टक्के) घसरण झाली आणि तो १९,३८४.३० पातळीवर स्थिरावला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची कमाई कमी होण्याच्या भीतीमुळे देशांतर्गत पातळीवर निर्देशांकात घसरण झाली. मात्र अमेरिकेतील महागाई दरदेखील नियंत्रणात येण्याच्या आशावादाने निर्देशांकातील घसरण मर्यादित राखली. किमान राखीव किमतीपेक्षा अधिक झालेले घाऊक बाजारातील दर, खरिपाच्या पेरण्यांना झालेल्या विलंबामुळे देशांतर्गत अन्नधान्य महागाईत वाढ झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांना सावध पवित्रा घेण्यास भाग पाडले. मान्सूनची प्रगती आणि जुलैमधील खरीप पेरणीचा कल हेच भविष्यातील महागाई नियंत्रणात राहणार अथवा नाही हे निश्चित करणार आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रिड, मारुती, एचडीएफसी आणि टाटा स्टीलच्या समभागात घसरण झाली. तर दुसरीकडे कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स, नेस्ले, टायटन, स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तेजीत व्यवहार करत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) समभाग खरेदी गती कायम राखली असून मंगळवारच्या सत्रात १,१९७.३८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
GAURAV MUTHE