लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला समभाग विक्रीचा मारा आणि निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये घसरणीने बाजाराला खाली खेचले. परिणामी मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये ३०० अंशांहून अधिक घसरण झाली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१६.३१ अंशांनी घसरून ६५,५१२.१० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४८३.८२ अंश गमावत ६५,३४४.५९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०९.५५ अंशांची घसरण झाली आणि तो १९,५२८.७५ पातळीवर बंद झाला.
अमेरिकी रोखे उत्पन्नावरील वाढता परतावा दर आणि डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत भांडवली बाजारात समभाग विक्री सुरू आहे. मात्र खनिज तेलाचे दर कमी झाल्याने त्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने बाजारातील घसरण मर्यादित राहिली आहे. तसेच सामान्य मॉन्सूनमुळे नजीकच्या काळात उपभोग क्षेत्रामध्ये सकारात्मक भावना राहण्याची शक्यता आहे. मात्र सप्टेबर महिन्यातील वाहन विक्रीच्या संमिश्र आकडेवारीमुळे वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागात घसरण झाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये मारुती, एनटीपीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी आणि महिंद्र अँड महिंद्रच्या समभागात घसरण झाली. तर बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह आणि टायटन या कंपन्यांचे समभाग तेजीत होते.