मुंबई: जागतिक बाजारातील कमकुवत संकेत, अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या धोरणासंबंधी चिंता आणि व्यापक प्रमाणावर झालेल्या नफावसुलीमुळे प्रमुख निर्देशांकात गुरुवारी दीड टक्क्यांची घसरण झाली. मुख्यतः निर्देशांकातील वजनदार समभाग असलेल्या इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्याने ‘सेन्सेक्स’ने ८० हजारांची पातळी सोडली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,१९०.३४ अंशांनी म्हणजेच १.४८ टक्क्यांनी कोसळून ७९,०४३.७४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,३१५.१६ अंश गमावत ७८,९१८.९२ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये देखील ३६०.७५ अंशांची घसरण झाली आणि तो २३,९१४.१५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>>एनटीपीसी ग्रीन एनर्जीने केले मालामाल; समभाग १२ टक्के तेजीत
विद्यमान आठवड्यात तेजीवाल्यांनी जोरदार पुनरागमन केल्यानंतर बाजारात उत्साही वातावरण होते. मात्र दर कपातीबाबत वाढती अनिश्चितता आणि वाढलेल्या भू-राजकीय तणावामुळे अमेरिकी भांडवली बाजारासह जगभरातील भांडवली बाजारांमध्ये समभाग विक्रीचा मारा झाला. देशांतर्गत आघाडीवरही गेल्या काही सत्रात तेजीत असलेल्या माहिती-तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. तसेच परदेशी गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉलकॅप आणि मिडकॅपमधील कमी मूल्यांकनाला उपलब्ध कंपन्यांच्या समभाग खरेदीला प्राधान्य दिले, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, टेक महिंद्र, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉवर ग्रिडच्या समभागात घसरण झाली. तर मोठ्या पडझडीत स्टेट बँकेचा समभाग सकारात्मक पातळीवर टिकून राहण्यास यशस्वी ठरला.
सेन्सेक्स ७९,०४३.७४ -१,१९०.३४ -१.४८%
निफ्टी २३,९१४.१५ – ३६०.७५ -१.४९%
डॉलर ८४.४९ ९ पैसे
तेल ७३.१८ ०.४९