मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ६० देशांवर जशास तसे आयात कराची घोषणा केल्यांनतर गुंतवणूकदारांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा केला. जागतिक पडझडीमुळे गुरुवारी स्थानिक बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी देखील गडगडले. मात्र सत्रारंभीच्या मोठ्या आपटीतून ते पुढे लक्षणीय सावरतानाही दिसले

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२२.०८ अंशांनी (०.४२ टक्के) घसरून ७६,२९५.३६ पातळीवर बंद झाला. सत्रारंभी त्याने ८०९.८९ अंश गमावत ७५,८०७.५५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र ट्रम्प यांच्या कर तडाख्यातून बचावलेल्या औषधी निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमधील तेजीने निर्देशांकातील तोटा बव्हंशी भरून काढला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८२.२५ अंशाची घसरण (०.३५ टक्के) झाली आणि तो २३,२५०.१० पातळीवर स्थिरावला.

अमेरिकेच्या आयात कराच्या घोषणेनंतर निफ्टी निर्देशांकात घसरण झाली. मात्र या घोषणेचे परिणाम नगण्य अथवा सौम्य असलेल्या निवडक कंपन्यांच्या समभागांत खरेदीही झाल्याने बाजार मोठ्या पडझडीतून सावरला. सुरुवातीच्या सत्रात झालेल्या तोटा भरून काढण्यास त्यामुळे मदत झाली, असे रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधक अजित मिश्रा म्हणाले.

सेन्सेक्समध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्र, इन्फोसिस, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अँड महिंद्र, भारती एअरटेल आणि मारुती सुझुकी इंडिया, टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर पॉवरग्रिड, सन फार्मास्युटिकल्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टायटन, इंडसइंड बँक आणि ॲक्सिस बँकेचे समभाग वधारले.

ट्रम्प काय म्हणाले?

हा २ एप्रिल २०२५ म्हणजे मुक्ती दिनच. हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल. दीर्घकाळापासून वाट पाहात असलेला हा क्षण म्हणजे अमेरिकी उद्योगांचा पुनर्जन्मच आहे. अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवण्यास या दिवसापासून आपण सुरुवात केली, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमधून केलेल्या भाषणात प्रतिपादन केले.

अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २७ टक्के आयात शुल्क लादले आहे. ट्रम्प प्रशासनाने व्यापार तूट कमी करून उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक स्तरावर लादल्या गेलेल्या अमेरिकी उत्पादनांवरील उच्च करांना तोंड देण्यासाठी ऐतिहासिक उपाययोजना म्हणून ट्रम्प यांनी सुमारे ६० देशांवर या जशास तसे कराच्या दरांची बुधवारी घोषणा केली.

आकडे –

सेन्सेक्स ७६,२९५.३६ -३२२.०८ -०.४२%

निफ्टी २३,२५०.१० -८२.२५ -०.३५%

तेल ७२.१९ -३.६८ टक्के

डॉलर ८५.३० -२२ पैसे