मुंबई : गुंतवणुकीचा आटलेला ओघ, त्यातच परदेशी गुंतवणूकदारांच्या निर्गमनामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. देशांतर्गत आघाडीवर गृहनिर्माण, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमधील विक्रीच्या माऱ्याने बाजाराला घसरणीने घेरले.

गुरुवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९४.७५ अंशांनी म्हणजेच ०.६१ टक्क्यांनी घसरून ८१,००६.६१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्यात ५९५.७२ अंशांची घसरण होत त्याने ८१,००० अंशांची पातळी मोडत ८०,९०५.६४ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२१.४५ अंशांची घसरण झाली आणि तो २४,७४९.८५ पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>व्यापार तूट घटून सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, महिंद्र अँड महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, टायटन, मारुती, ॲक्सिस बँक आणि टाटा स्टीलच्या समभागात घसरण झाली. तर टेक महिंद्र, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँकेच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी ३,४३५.९४ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली

सहा लाख कोटींच्या संपत्तीचा ऱ्हास

सेन्सेक्समधील गुरुवारच्या सत्रातील घसरणीने गुंतवणूकदारांच्या मत्तेला ६ लाख कोटी रुपयांची झळ बसली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सेन्सेक्सने उणे ३.९१ टक्के परतावा दिला आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात गुरुवारच्या सत्रात ६.०३ लाख कोटींची घसरण झाली असून ते ४५७.२५ लाख कोटी (५.४४ ट्रिलियन डॉलर) रुपयांपर्यंत खाली आले आहे.

हेही वाचा >>>वारी एनर्जीजचा प्रत्येकी १,४२७ ते १,५०३ रुपये किमतीला ‘आयपीओ’ २१ ऑक्टोबरपासून

सेन्सेक्स ८१,००६.६१ -४९४.७५ (-०.६१%)

निफ्टी २४,७४९.८५ -२२१.४५ (-०.८९%)

डॉलर ८४.०७ ५

तेल ७४.४२ ०.२७