मुंबई : आखाती देशांमधील वाढता तणाव आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीच्या तुफान माऱ्याने प्रमुख निर्देशांकानी शुक्रवारच्या सत्रात १ टक्क्यांहून अधिक पडझड अनुभवली. सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात उच्चांकीपातळीपासून नीचांकीपातळीपर्यंत सुमारे १८३५ अंशांची अस्थिरता अनुभवली.

ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे निर्देशांकात १ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. आखाती देशांमधील भू-राजकीय तणावामुळे खनिज तेला पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यापरिणामी बाजारांच्या चिंतेत अधिक भर घातली.

हेही वाचा >>>‘स्विगी’च्या भागधारकांकडून वाढीव निधी उभारणीस मंजुरी

सलग पाचव्या सत्रात सुरू असलेल्या घसरणीमुळे, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८०८.६५ अंशांनी घसरून ८१,६८८.४५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८१,५३२.६८ ची नीचांकी आणि ८३,३६८.३५ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. ज्यामुळे सेन्सेक्सने दिवसभरात १,८३५.६५ अंशाचा प्रवास अनुभवाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये देखील २००.२५ अंशाची घसरण झाली आणि तो २५,०४९.८५ पातळीवर बंद झाला. मात्र सत्रात त्याने २५ हजार अंशांची महत्त्वाची पातळी ओलांडत २४,९६६.८० ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली.

गुंतवणूकदार आखाती देशांमधील वाढत्या संघर्षावर लक्ष ठेवून आहेत परिणामी त्यांनी समभाग विक्रीचा मारा करून नफावसुलीला प्राधान्य दिले. एकूणच भांडवली बजाजरात मंदीची कायम आहे. खनिज तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत, याबरोबर ओपेकप्लस देशांकडून खनिज तेल उत्पादनातील वाढ कमी खेळू जाण्याची शक्यता आहे. सेन्सेक्समध्ये गृहनिर्माण, वाहन निर्मिती आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात घसरण झाली. मात्र फेडकडून झालेल्या दरकपातीनंतर एकमेव माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्र तेजीत आहे. चीनचा स्वस्त भांडवली बाजार म्हणजे कमी मूल्यांकनाला उपलब्ध असलेल्या समभागांमुळे परदेशी निधी तिकडे वळतो आहे. शिवाय खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे नजीकच्या काळात बाजारातील निराशा कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>>पाच वर्षांत १ कोटी ‘इंटर्नशिप’ प्रदान करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट

सेन्सेक्समध्ये आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी महिंद्र अँड महिंद्र, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, नेस्ले, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर इन्फोसिस, टेक महिंद्र, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि स्टेट बँकेचे समभाग तेजीसह स्थिरावले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी १५,२४३.२७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ८१,६८८.४५ -८०८.६५ (-०.९८%)

निफ्टी २५,०४९.८५ -२००.२५ (-०.९३%)

डॉलर ८३.९६ —

तेल ७८.३९ +०.९९