मुंबई: वायदे करारांच्या मासिक समाप्तीपूर्वी बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स बुधवारच्या सत्रात ७२८ अंशांनी घसरला आणि सलग सात सत्रांमध्ये सुरू राहिलेली तेजीही त्यातून खंडित झाली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२८.६९ अंशांनी घसरून ७७,२८८.५० पातळीवर स्थिरावला. त्यातील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २५ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. दिवसभरात त्याने ८२२.९७ अंश गमावत ७७,१९४.२२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८१.८० अंशांची घसरण झाली आणि तो २३,४८६.८५ पातळीवर बंद झाला. आधीच्या सात सत्रात सेन्सेक्सने ४,१८८.२८ अंशांची म्हणजेच ५.६७ टक्क्यांची कमाई केली, तर याच काळात निफ्टी १,२७१.४५ अंशांनी (५.६७ टक्के) वधारला होता.

पुढील आठवड्यात अमेरिकेच्या संभाव्य व्यापार शुल्काच्या घोषणेआधी बाजारात नफावसुली झाली. अमेरिकेकडून ज्या क्षेत्रांमध्ये व्यापार शुल्क अधिक आकारले जाण्याची शक्यता आहे, अशा औषधी निर्माण आणि माहिती-तंत्रज्ञान या निर्यातप्रवण क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. काही निवडक दिग्गज कंपन्यांच्या समभागांमध्ये नफावसुलीने निर्देशांकाला खाली खेचले, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, टेक महिंद्र, झोमॅटो, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, मारुती, स्टेट बँक, कोटक महिंद्र बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचडीएफसी बँकेचे समभाग घसरणीसह बंद झाले. तर या पडझडीत इंडसइंड बँक, एचसीएल टेक, टायटन, महिंद्र अँड महिंद्र आणि पॉवर ग्रिड यांची कामगिरी सकारात्मक राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ५,३७१.५७ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले होते.

घसरणीची प्रमुख कारणे

– सलग सत्रात सत्रातील तेजीनंतर नफावसुली

– येत्या आठवड्यात अमेरिकी व्यापार धोरणाची अंमलबजावणी शक्य

– अमेरिकेवर निर्भर माहिती-तंत्रज्ञान समभागांना विक्रीचा फटका

सेन्सेक्स ७७,२८८.५० -७२८.६९ (-०.९३%)

निफ्टी २३,४८६.८५ – १८१.८० (-०.७७%)

तेल ७३.४४ ०.५८ टक्के

डॉलर ८५.६९ -३ पैसे