लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक अर्ध्या टक्क्याहून अधिक वधारले. शिवाय बुधवारच्या सत्रात झालेल्या पडझडीमुळे गेल्या काही सत्रात उच्चांकी पातळीवर असलेले समभाग स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांनी त्या समभागांच्या खरेदीला प्राधान्य दिले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३५८.७९ अंशांनी वधारून ७०,८६५.१० पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच निर्देशांकाने ५८५.९२ गमावत ६९,९२०.३९ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. मात्र, दुपारच्या सत्रात बाजाराला गती मिळाली आणि ४५२.४ अंशांची झेप घेत ७०,९५८.७१ असा सत्रातील उच्चांकी पातळीवर सेन्सेक्स पोहोचला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०४.९० अंशांची वाढ झाली आणि तो २१,२५५.०५ पातळीवर पोहोचला. दिवसभरात त्याने २१,२८८.३५ अंशांचा उच्चांक तर २०,९७६.८० हा नीचांक नोंदवला होता.
हेही वाचा >>>Business Ideas : २५ व्यवसायाच्या आयडियांमधून निवडा तुम्हाला सोयीस्कर असा व्यवसाय अन् कमवा महिन्याला १ लाख रुपये
बुधवारच्या सव्वा टक्क्याहून अधिक सेन्सेक्स-निफ्टीच्या गटांगळीपाठोपाठ, गुरुवारी भांडवली बाजाराने मोठ्या घसरणीसह निराशाजनक सुरुवात केली. मात्र गुंतवणूकदारांनी घसरलेल्या बाजारात सुरू केलेल्या खरेदीने बाजार दिवसभरातील नीचांकी पातळीवरून सावरला. तरी, एकूणच बाजारात उत्साहाचा अभाव राहिला. अमेरिकेची सकल देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी जाहीर होणार आहे. परिणामी सावधगिरी म्हणून जागतिक बाजारपेठेत नकारात्मक पातळीवर व्यवहार सुरू होते. शिवाय जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीतील वाढ आणि देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईच्या चिंतेमुळे गेल्या दोन महिन्यांच्या तेजीमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, स्टेट बँक, टाटा स्टील आणि भारती एअरटेल यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक आणि महिंद्र अँड महिंद्रच्या समभागात घसरण झाली.
सेन्सेक्स ७०,८६५.१० ३५८.७९ (०.५१)
निफ्टी २१,२५५.०५ १०४.९० (०.५०)
डॉलर ८३.२७ ९
तेल ७९.९६ ०.३३