मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ४९६ अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी शुक्रवारी २१,६०० अंश पातळीवर बंद झाला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला. शिवाय जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे निर्देशांकांना तीन सत्रातील तोटा भरून काढण्यास मदत झाली.
सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९६.३७ अंशांनी वधारून ७१,६८३.२३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ७०८.७८ अंशांची उच्चांकी झेप घेत ७१,८९५.६४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६०.१५ अंशांची भर पडली आणि तो २१,६२२.४० पातळीवर स्थिरावला. त्यातील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी ४३ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले.
हेही वाचा >>> ‘आयपीओ’साठी अप्लाय करताय? सेबीच्या अध्यक्षा काय म्हणताय ते वाचा
मागील तीन सत्रांत सेन्सेक्स २.९१ टक्क्यांनी आणि निफ्टी २.८७ टक्क्यांनी गडगडला आहे.
बाजार पडझडीत समभागांचे भाव खालावले असताना खरेदी म्हणजेच ‘बाय ऑन डिप्स’ या सूत्राने प्रेरित होऊन गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी केल्याने बाजार सावरला. तेजीची दमदार दौड सुरू असताना, त्यात खंड पडल्याने गुंतवणूकदार अस्वस्थ बनले होते. व्याजदर अल्पावधीत कमी होण्याची मावळलेली आशा आणि सरलेल्या डिसेंबर तिमाहीत कंपन्यांची कामगिरी अपेक्षेनुरूप राहणार नसल्याने गुंतवणूकदार सध्या बाजारात पुन्हा तेजीच्या प्रतीक्षेत आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचा समभाग ३.५२ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ एनटीपीसी ३.०४ टक्के आणि टेक महिंद्र २.५६ टक्क्यांनी वाढले. महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे इंडसइंड बँक, कोटक महिंद्र बँक आणि स्टेट बँकेच्या समभागात घसरण झाली. गुरुवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी ९,९०१.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्स ७१,६८३.२३ ४९६.३७ ( ०.७०)
निफ्टी २१,६२२.४० १६०.१५ ( ०.७५)
डॉलर ८३.०६ -७ तेल ७९.६० ०.६३