मुंबई: देशांतर्गत आघाडीवर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेसारख्या खासगी बँकाच्या समभागांमधील चौफेर खरेदी आणि परदेशी निधीच्या ताज्या प्रवाहामुळे प्रमुख निर्देशांक बुधवारी सलग चौथ्या सत्रात सकारात्मक पातळीवर बंद झाले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११०.५८ अंशांनी वधारून ८०,९५६.३३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३९९.६४ अंशांची कमाई करत त्याने ८१,२४५.३९ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. मात्र दिवसाअखेर ८१,००० अंशांच्या पातळीपुढे बंद होण्यास अयशस्वी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०.३० अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो २४,४६७.४५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>> मिडकॅप फंडातील ‘एसआयपी’तून परतावा २२ टक्क्यांपर्यंत
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक वधारले. तर भारती एअरटेल, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, मारुती, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार मंगळवारी नक्त खरेदीदार ठरले. त्यांनी ३,६६४.६७. कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
रुपया आणखी खोलात
मुंबई: डॉलरच्या तुलनेत रुपयांची नीचांकी घसरण कायम असून बुधवारच्या सत्रात आणखी आठ पैशांच्या घसरणीसह रुपया ८४.७६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला. खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढली आहे. आंतरबँक चलन विनिमयात, रुपयाने ८४.६६ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि ८४.६५ ते ८४.७६ या श्रेणीत व्यवहार करत होता. दिवसभरात मंगळवारच्या सत्रातील ८४.६८ प्रति डॉलर या बंद पातळीच्या तुलनेत तो ८ पैशांनी घसरला.
सेन्सेक्स ८०,९५६.३३ ११०.५८ ( ०.१४%)
निफ्टी २४,४६७.४५ १०.३० ( ०.०४%)
डॉलर ८४.७६ ८ पैसे
तेल ७३.९१ ०.३४ वाढ