मुंबई : सलग तीन सत्रांतील तोट्याच्या मालिकेला खंड पाडून, भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी जवळजवळ एक टक्क्याने वाढ साधणारी उसळी घेतली. उत्साही वाढीने सुरुवात केल्यानंतर संपूर्ण दिवसभर ठरावीक पट्ट्यात घिरट्या घातल्यानंतर, सेन्सेक्स ४८०.५७ अंशांनी (०.७४ टक्के) वाढून ६५,७२१.२५ वर दिवसअखेरीस स्थिरावला. दिवसभरात त्याचा उच्चांक गुरुवारच्या तुलनेत ५५८.५९ अंश अधिक म्हणजे ६५,७९९.२७ असा होता. निफ्टी निर्देशांकही १३५.३५ अंशांनी (०.७० टक्के) वाढून १९,५१७ वर बंद झाला. तीन दिवसांतील घसरण मोठी राहिल्याने, साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स ४३८.९५ अंश घसरणीने आणि निफ्टी १२९.०५ अंशाच्या घसरणीसह बंद झाला. दोन्ही निर्देशांकांसाठी सलग दुसरा सप्ताह तोट्याचा राहिला.
हेही वाचा >>> कॉसमॉस बँकेची ७.७५ टक्के व्याजदराची नवीन ठेव योजना
सेन्सेक्समधील इंडसइंड बँक सर्वाधिक ३.२५ टक्क्यांनी वाढला, त्यानंतर टेक महिंद्र, विप्रो, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टीसीएस, एल अँड टी आणि इन्फोसिस हे वाढ साधणारे समभाग होते. त्याउलट, तिमाही निकालांच्या घोषणेआधी स्टेट बँक, त्याचप्रमाणे एनटीपीसी, मारुती, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स आणि पॉवर ग्रिड हे समभाग घसरले. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६६ टक्क्याने आणि ०.६५ टक्क्याने वाढला.
पुढील आठवडा देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असेल. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरासंबंधी निर्णय जाहीर केला जाणार आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी व्याज-संवेदनशील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिवाय बाजाराला तोवर अस्थिरतेचा वेढा पडण्याची शक्यता आहे.
– सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख