Sensex Bounce Back in BSE: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या Reciprocal Tariff च्या पडछायेखाली काळवंडलेल्या मुंबई शेअर बाजाराला अखेर आज पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४ हजार अंकांनी कोसळल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात व्यवहार सुरू होताच शेअर बाजारानं तब्बल १२०० अंकांची उसळी घेतली आहे. निफ्टी५० नंही सेन्सेक्सचा हात धरून तेवढ्याच वेगात २२,५५० हजारांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.

कुणाची झाली भरभराट?

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सनं मोठी झेप घेतल्यानंतर त्यात टायटन, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय या शेअर्सनं मोठी झेप घेतल्याचं दिसून आलं. हे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांनी वर गेले. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, टाट मोटर्स, भारती एअरटेल हे शेअर्सदेखील सकाळच्या पहिल्या सत्रात किमान २ टक्क्यांनी वाढले.

Nifty50 ची काय परिस्थिती?

Sensex पाठोपाठ निफ्टीनंही सकाळी व्यवहार सुरू होताच जवळपास दीड टक्क्यांनी म्हणजे जवळपास ३८७.८५ अंकांनी वाढ नोंदवली. यामुळे निफ्टी थेट २२.५४९ अंकांपर्यंत पोहोचला. च्याचवेळी सेन्सेक्स जवळपास १२०० अंकांनी वाढून ७४,३३७ पर्यंत पोहोचला. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी एकूण २९ शेअर्सनं कालची मरगळ झटकून गुंतवणूकदारांना नवी उमेद दाखवली. पॉवर ग्रीड हा एकमेव शेअर सकाळी तोट्यात चालू असल्याचं दिसून आलं.

सोमवारी नेमकं काय घडलं?

मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात निराशाजनक झाली. व्यापार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ३ हजार अंकांनी कोसळला. दिवसभर शेअर बाजारानं हाच कित्ता गिरवला. हे प्रमाण शेवटी ४ हजार अंकांपर्यंत पोहोचलं. गेल्या १० महिन्यांतली ही शेअर बाजाराची नीचांकी कामगिरी ठरली. सोमवारच्या एकाच दिवसात मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या हजारो कोटींचा चुराडा झाला.

भारतीय बाजारपेठेप्रमाणेच अमेरिकन शेअर बाजारातही डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्राचे दुष्परिणाम दिसून येत असून तिथेही मोठ्या प्रमाणावर पडझड पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाचा अमेरिकेला बसत असलेला फटका पाहाता अमेरिकेच्या अनेक भागांत जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध करताना दिसत आहे. इतर देशांमधून आयात होणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणावर व्यापार कराची आकारणी केल्यामुळे अमेरिकेत या वस्तूंची आयात होण्याचं प्रमाण घटलं आहे. मात्र, त्या तुलनेत त्या वस्तूंचं देशांतर्गत उत्पादन वाढलं नसल्यामुळे अमेरिकेतील जनतेा मोठ्या प्रमाणावर महागाईचा सामना करावा लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच भीतीमुळे अमेरिकन जनतेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाचा निषेध केला जात आहे.