आज (शुक्रवारी) शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ४३९.७५ अंकांची वाढ झाली आहे. याशिवाय निफ्टीमध्येही १३२.०५ अंकांची वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. या वाढीसह मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स ८३ हजार ६२४.५५ तर निफ्टी २५ हजार ५४७.८५ वर पोहोचला आहे. अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी बघायला मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, गुरुवारी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक कालावधींनंतर व्याजदर कपात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठल्याचे बघायला मिळालं होतं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स २३६.५७ अंकांनी वधारून ८३,१८४.८० या सर्वकालीन उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ८२५.३८ अंकांची उसळी घेत ८३,७७३.६१ हे ऐतिहासिक शिखर गाठले होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३८.२५ अंकांची वाढ होत, तो २५,४१५.८० पातळीवर स्थिरावला होता. त्याने देखील २५,६११.९५ या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला होता.

हेही वाचा – Bajaj Housing Finance share: बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर मिळाला तर गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल; वाचा कधी लिस्टिंग होणार?

महत्त्वाचे म्हणजे ‘फेड’ने यावेळी अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे अर्ध्या टक्क्याची व्याजदर कपात केल्याने तसेच भविष्यातही व्याजदरात कपातीचे संकेत दिल्याने शेअर बाजारातील तेजी बघायला मिळत असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नव्हे तर अमेरिकेपासून जपानपर्यंत विविध शेअर मार्केटमध्ये तेजीचे वारे वाहू लागले आहेत.