मुंबई: निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील जोरदार समभाग खरेदीमुळे निर्देशांकांनी त्यांचे मागील सत्रातील नुकसान भरून काढले आणि बुधवारच्या सत्रात १ टक्क्यांची उसळी घेतली. आज जाहीर होणारा अंतरिम अर्थसंकल्प आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंबंधीच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६१२.२१ अंशांनी वधारून ७१,७५२.११ पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने ७११.४९ अंशांची कमाई करत ७१,८५१.३९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.६० अंशांची भर पडली आणि तो २१,७२५.७० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>> जीएसटीतून तिजोरीत १.७२ लाख कोटींची भर; आतापर्यंतचे दुसरे-सर्वोच्च मासिक संकलन

अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी भारतीय बाजारपेठांमध्ये सकारात्मक चित्र दिसून आले. वाढत्या कर महसुलामुळे वित्तीय तूट कमी होण्याची अपेक्षा आहे. घसरलेल्या किमतीत समभाग खरेदीचे धोरण अर्थात ‘बाय ऑन डिप्स धोरण’ आतापर्यंत प्रभावी ठरले आहे. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी जगभरातील भांडवली बाजारांमध्ये संमिश्र वातावरण होते. अमेरिकी रोखे बाजारातील १० वर्ष मुदतीच्या रोख्यांवरील परताव्या दरात किरकोळ घसरण झाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणारे, बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १.८३ टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक १.५७ टक्क्यांनी वधारले. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, टाटा मोटर्स, स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र, मारुती, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांचे समभाग तेजीत होते.

गुंतवणूकदार ४.५८ लाख कोटींनी श्रीमंत

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.५८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४,५८,१३० कोटी रुपयांनी वाढून ३७९.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

सेन्सेक्स ७१,७५२.११, + ६१२.२१

निफ्टी २१,७२५.७०, + २०३.६०

डॉलर ८३.०४ – ६

तेल ८२.१२ -०.९१

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex jumps 612 points ahead of budget fed interest rate decision print eco news zws
Show comments