मुंबई: अमेरिका आणि आशियाई भांडवली बाजारांमधील सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत आघाडीवर एचडीएफसी बँक, इन्फोसिसमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांक १ टक्क्यानी वधारले. अत्यंत अस्थिर बाजारात सेन्सेक्सने पुन्हा ७३,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली.
दिवसअखेर सेन्सेक्स ६७६.६९ अंशांनी म्हणजेच ०.९३ टक्क्यांनी वधारून ७३,६६३.७२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ७२,५२९.९७ अंशांचा नीचांक गाठल्यानंतर, ७३,७४९.४७ च्या उच्चांकांपर्यंत तब्बल १,२२० अंशांमध्ये हालचाल दर्शविली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.३० अंशांची वाढ झाली आणि दिवसअखेर तो २२,४०३.८५ पातळीवर बंद झाला.
‘क्रिप्टो’ व्यवहारांवर नियंत्रणासाठी सेबी अनुकूल; रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेला छेद देणारा पवित्रा
मजबूत जागतिक कल आणि अमेरिकेतील महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक नरमल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात अखेरच्या काही तासांत जोमदार खरेदीचे पडसाद उमटले. अमेरिकेत २०२४ सालात दोनदा व्याजदर कपात केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही भारतातून निर्यातीत वाढ झाल्याने बाजारातील उत्साही वातावरणात भर घातली. या पार्श्वभूमीवर बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागांत चांगली खरेदी झाल्याने निर्देशांकांना बळ मिळाले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, भारती एअरटेल, टेक महिंद्र, टायटन, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो आणि कोटक महिंद्र बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर मारुती, स्टेट बँक, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स आणि इंडसइंड बँकेच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या माहितीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गेले दोन महिने सुरू असलेल्या प्रघाताप्रमाणे बुधवारीही २,८३२.८३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्स ७३,६६३.७२ ६७६.६९ ०.९३%
निफ्टी २२,४०३.८५ २०३.३० ०.९२%
डॉलर ८३.५० ४
तेल ८२.४५ -०.३३