लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या निर्णयानंतर व्याजदर कपातीच्या वेळेबाबत अजूनही अनिश्चितता कायम असल्याने बँकिंग आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे गुरुवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे १ टक्क्याची घसरण झाली आणि सकाळी सत्रारंभी तेजीतून कमावलेले सर्व गमावत सेन्सेक्स ७२४ अंशांनी गडगडला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२३.५७ अंशांनी घसरून ७१,४२८.४३ रुपयांवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीतील निर्णय आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या त्यासंबंधाने समालोचनानंतर, प्रमुख निर्देशांकांनी नकारात्मक पातळीत प्रवेश केला. सेन्सेक्सने दिवसभरात ९२१.३८ अंश गमावत ७१,२३०.६२ ही सत्रातील नीचांकी पातळीही दाखवली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २१२.५५ अंशांची घसरण झाली आणि तो २१,७१७.९५ पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला.

जागतिक अनिश्चितता पाहता आणि देशांतर्गत किरकोळ चलनवाढ ४ टक्के पातळीपर्यंत खाली आणण्याची गरज लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने गुरुवारी सलग सहाव्यांदा रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय आगामी काळात व्याजदर कपातीच्या शक्यतेबाबत कोणते संकेतही मध्यवर्ती बँकेने न देणे ही बाब भांडवली बाजार गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली नाही.

हेही वाचा >>>टाटा समूह शेअर बाजारात ‘नंबर वन’; गाठला ३० लाख कोटींचा टप्पा

ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्या, बँका आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील लार्जकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांची तिसऱ्या तिमाहीतील असमाधानकारक कामगिरी आणि मुख्यतः ग्रामीण भागातून मागणी घटल्याने कमाईवर परिणाम झाला, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आयटीसी, कोटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, मारुती आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे स्टेट बँक, पॉवरग्रिड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १,६९१.०२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा >>>एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले!

सेन्सेक्स ७१,४२८.४३ -७२३.५७ (-१.०० %)

निफ्टी २१,७१७.९५ -२१२.५५ (-०.९७ %)

डॉलर ८२.९६ —

तेल ७९.०७ -०.१८