एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोर धरू लागलेला असताना दुसरीकडे सेन्सेक्सनंही जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्सनं मोठी उसळी घेत ऐतिहासिक उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स ७४ हजार ६५८ इतक्या सर्वाकालीक उच्चांकावर पोहोचला. त्यापाठोपाठ निफ्टी५०नंही उसळी घेतली असून सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनं २२ हजार ६२३ अंकांपर्यंत वाढ नोंदवली. त्यामुळे निवडणूक काळात शेअर बाजारात तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई शेअर बाजारात आज दिवसाच्या सुरुवातीलाच तेजी पाहायला मिळाली. आयटी आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचा यात मोठा वाटा होता. एकीकडे सेन्सेक्सनं आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली असताना निफ्टी५०नंही घोडदौड कायम ठेवली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह आणि टायटन या पाच कंपन्या निफ्टी५०मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या ठरल्या. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन, अपोलो हॉस्पिटल, विप्रो, दिवीज लॅबोरेटरीज आणि एचडीएफसी बँक हे निफ्टीच्या यादीतील सर्वात तळाशी राहिलेले शेअर्स ठरले.

निफ्टीमध्ये आज व्यवहार सुरू झाल्यानंतर रिअॅल्टी, ऊर्जा आणि मेटल उद्योगातील कंपन्यांचा भाव चांगलाच वधारला. निफ्टी सेक्टोरल इंडिक्समधील १५ पैकी १२ कंपन्यांचे शेअर्स फायद्यात पाहायला मिळाले. निफ्टी बँक मात्र या काळात ०.०९ टक्क्यांनी खाली उतरत ४८ हजार ४४८ पर्यंत आला.

Story img Loader